कोणताही धर्म प्रदूषण पसरवत नाही !
सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी : फटाके बंदीच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दीपावलीच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे दिल्ली पोलिसांनी गांभीर्याने पालन केले नाही, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले असून, कोणताही धर्म प्रदूषणाचे समर्थन करत नाही, अशी टिप्पणीही केली आहे. दिल्ली पोलिसांनी फटाक्यांवर बंदीचा आदेश लागू करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.
तसेच, फटाकेबंदीचा आदेश लागू करण्यासाठी आतापर्यंत कोणती पावले उचलली आणि कोणती उपाययोजना केली, याची सविस्तर माहिती देणारे व्यक्तीगत प्रतिज्ञापत्र दिल्ली पोलीस आयुक्तांनी न्यायालयाला सादर करावे, असा आणखी एक आदेशही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी दिला आहे.
जनतेचा अधिकार
प्रदूषणमुक्त वातावरणात जीवन जगण्याचा सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे. हा घटनेच्या अनुच्छेद 21 नुसार लोकांचा मूलभूत अधिकार आहे. या अधिकाराचे संरक्षण होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने फटाक्यांवर स्थायी स्वरुपातील बंदी घालण्यासाठी पावले उचलावीत, असा आदेशही देण्यात आला.
समितीचाही आदेश
यावर्षी पार पडलेल्या दीपावलीच्या काळात दिल्लीमध्ये प्रदूषणाचे प्रमाण धोकादायक प्रमाणात वाढल्याचे दिसून आले होते. त्यामुळे दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीनेही फटाक्यांचे उत्पादन, फटाक्यांची विक्री आणि फटाके वाजविण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. तथापि, केंद्र सरकार, विविध राज्यसरकारे आणि प्रदूषण व्यवस्थापन प्राधिकारणे यांच्यात योग्य तो समन्वय नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचेही पालन योग्य प्रकारे केले गेले नाही. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपला संताप तसेच हतबलताही व्यक्त केली आहे.
दिल्लीची हवा चिंताजनक
दिल्लीचे हवामान सातत्याने चिंताजनक पातळीवर राहिले आहे. दीपावली संपल्यानंतरही अद्याप प्रदूषणाचा प्रभाव फारसा ओसरलेला नाही. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार दिल्लीपील प्रदूषणाच्या पातळीचा निर्देशांक 349 होता. दिल्लीतील हवामान अत्यंत खराब असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. त्यामुळे देशाची राजधानी असलेल्या या शहरात श्वसनाचे विकार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे विविध रुग्णालयांनी सादर केलेल्या माहितीवरुन दिसून येत आहे. ज्यांना पूर्वी श्वसनाचे आजार नव्हते, त्यांनाही या आजारांनी घेरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.