एकाही आंदोलनकर्त्यास अटक नाही
मुख्यमंत्र्यांच्या खुलाशानंतर विरोधकांचा निषेध संपुष्टात
पणजी : पाणी टंचाईच्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा सुरु असताना आमदार वीरेश बोरकर यांनी युनिटी मॉलविरोधी मोर्चेकऱ्यांना काहीतरी ‘शब्द’ देण्याची मागणी केली तसेच त्यांना अटक झाल्याचे सांगून विरोधी पक्षनेते युरी आलेमांवसह विरोधी आमदारांनी सभापतींच्या समोर येऊन निषेध, घोषणाबाजी सुरु केली. त्यावेळी विधानसभागृहात गोंधळ माजला. त्या गोंधळातच कामकाज सुरु ठेवण्यात आले.
उपसभापती जोशुआ डिसोझा हे सभापती होते. जवळपास 20 मिनिटे विरोधी आमदारांची युनिटी मॉल विरोधी घोषणाबाजी चालू होती. ते खाली बसले व पुन्हा उठले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोणालाही अटक केली नसल्याचा खुलासा केल्यानंतर विरोधकांचा निषेध संपुष्टात आला आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले.
या गोंधळातच पाणी खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी लक्षवेधी सूचनेवर उत्तर दिले. तसेच आमदारांनी भाषणे केली. त्यामुळे कोण काय बोलले तेच कळेनासे झाले. त्यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण चौकशी केली असून कोणालाही अटक करणार नाही. आंदोलकांनी चर्चेसाठी यावे. आपली चर्चेची तयारी आहे. त्यांना बोलणी करण्यासाठी दारे खुली आहेत, असे आवाहन डॉ. सावंत यांनी पुन्हा एकदा केले आहे.