For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगाव भागातील शेतवडीत ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने कुचंबणा

11:34 AM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
उचगाव भागातील शेतवडीत ये जा करण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने कुचंबणा
Advertisement

शेतकरी वर्गाला शेतवडीतून अवजारे आणणे अवघड : लोकप्रतिनिधींनी दखल घेणे गरजेचे

Advertisement

वार्ताहर/उचगाव

बेळगाव ग्रामीण मतदार क्षेत्रातील पश्चिम भाग तसेच उचगाव भागामध्ये शेतकरी वर्गाला शेतवडीत ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते कोणत्याच भागात नसल्याने शेतकऱ्यांची सातत्याने कुचंबणा होत असते. उचगाव गावाच्या चोहोबाजूने हजारो एकर जमिनीत पिके पिकविण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रंदिवस ये-जा असते. मात्र पक्के रस्ते कोठेच नसल्याने शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे कुचंबणा आणि हाल होत आहेत. याची दखल लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे, असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बेळगाव तालुक्यामध्ये काही क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), आमदार, खासदार फंडातून सिमेंटचे पक्के रस्ते केलेले दिसून येतात. असे पक्के रस्ते झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ट्रॅक्टर, बैलगाडी व इतर सर्व वाहने जाऊ शकतात. त्यामुळे शेतात शेतीची अवजारे, धान्य, बी बियाणे, खते यांची ने-आण करणे सोयीस्कर होते. याबरोबरच अनेकवेळा शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारातून शेतवडीत ये-जा करावी लागते. पक्के रस्ते असतील तर शेतकरी आनंदाने शेतात ये-जा करतात. मात्र पावसाळ्यात गुडघाभर चिखल आणि उन्हाळ्यात धुळीने माखलेल्या रस्त्यावरून शेतात जाणे म्हणजे कसरतीचेच असते.

Advertisement

या भागात काँक्रीटीकरण केलेले रस्ते कोठेच दिसून येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची सातत्याने कुचंबणा होत असते. रोज पहाटे जाऊन जनावरांचा चारा, गवताचे भारे आणावे लागतात. तसेच उसाची उचल, धान्यांच्या मळणीनंतर धान्य घरी आणणे, खताची वाहतूक करणे ही सर्व कामे या भागात करणे म्हणजे मोठे मुश्कील आहे. या भागाचा सर्व्हे केल्यास कोणत्याच भागात पक्के रस्ते दिसून येत नाहीत. पावसाळ्यात भरपूर चिखल आणि उन्हाळ्यात भरपूर धुळीने हे रस्ते माखलेले असतात. यासाठी एपीएमसी तसेच या भागाच्या लोकप्रतिनिधीनी या शेतवडीत शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी काँक्रिटीकरणाचे रस्ते प्रथमत: केले पाहिजेत. इतरत्र शासनाचा निधी खर्च करण्यापेक्षा तो अशा शेतवडीत रस्त्यासाठी खर्च केला तर शेतकरी आनंदाने शेतात जाऊन भरघोस पिके काढतील आणि याचा निश्चितच सर्व जनतेला फायदा होईल. अन्नधान्य पिकामध्ये भरमसाठ उत्पादन निघेल.तरी तातडीने याचा विचार लोकप्रतिनिधीने करून शेतवडीत ये-जा करण्यासाठी पक्क्या रस्त्यांची निर्मिती करावी, अशी मागणी बेळगावच्या पश्चिम भागातील हजारो शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.