पक्ष बदलणार नाही, काँग्रेससोबतचः राहुल पाटील
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचे स्पष्टोक्ती : पक्ष बदलणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम
कोल्हापूर
दिवंगत माजी आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी सोमवारी आपण इतर कोणत्याही पक्षात जाणार नसून काँग्रेससोबतच राहणार असल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून ते इतर पक्षात जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
दिवगंत आमदार पी. एन. पाटील हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित होते. शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेससोबतच राहिले. त्यांनी लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवारास ७१ हजारांचे मताधिक्य दिले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव राहूल पाटील यांचा पराभव झाला. गेल्या काही दिवसांपासून राहुल पाटील महायुतीत जाणार असून १ एप्रिलला त्यांचा प्रवेश होईल, अशी सोशल मीडीयावर चर्चा होती. श्रीपतराव बोंद्रे सहकारी बँकेत सोमवारी राहुल पाटील गटाची बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी काँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतला. गुरूवार दि. २७ रोजी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबतही राहुल पाटील गटाची बैठक होणार असून त्यांची हीच भूमिका कायम राहणार आहे. १ एप्रिल हा एप्रिल फुल असून मी काँग्रेससोबतच असणार आहे. माझी इतर पक्षात प्रवेश करण्याचा विचार नाही, अशी स्पष्टोक्ती राहुल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.