For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागावाटपाशिवाय यात्रेत सहभाग नाही

06:08 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
जागावाटपाशिवाय यात्रेत सहभाग नाही
Advertisement

समाजवादी पक्षाचा काँग्रेसला इशारा, 17 जागा देण्याची तयारी

Advertisement

वृत्तसंस्था / लखनौ

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह जागावाटपावर निणर्य झाल्यानंतरच राहुल गांधींच्या यात्रेस आपला पक्ष सहभागी होईल, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केले आहे. त्यांनी काँग्रेसला 17 जागा देण्याची तयारीही दर्शवली आहे. तथापि, काँग्रेसची मागणी 22 ते 25 जागांची असल्याचे समजते. त्यामुळे अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही.

Advertisement

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असली तरी, अद्याप विरोधकांच्या आघाडीला आकार आलेला नाही. कोणत्याही राज्यामध्ये जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांनी काँग्रेसशी जागावाटप करण्यास नकार दिला आहे. तर संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय लोकदल हे पक्ष आघाडीबाहेर पडले आहेत. त्यामुळे अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे.

यादव यांची अट

उत्तर प्रदेशात काँग्रेसला युती हवी असेल तर जागावाटपाचा निर्णय लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. आता जास्त वेळ उरलेला नाही. आम्ही काँग्रेसला 15 ते 17 जागा सोडण्यासाठी तयार आहोत. त्यापेक्षा अधिक जागा सोडणे सध्यातरी शक्य वाटत नाही. त्यामुळे आधी काँग्रेसने जागावाटपासंबंधी अंतिम निर्णय घ्यावा. त्यानंतर राहुल गांधींच्या यात्रेत सामिल व्हायचे की नाही, हे आम्ही ठरविणार आहोत, अशी भूमिका समाजवादी पक्षाने घोषित केली आहे.

आधी स्वीकारले आमंत्रण

राहुल गांधी यांच्या यात्रेत अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाला दिलेले होते. ते त्यांनी काही दिवसांपूर्वी स्वीकारलेलेही होते. तथापि, आता जागावाटपाचा मुद्दा समाजवादी पक्षाने पुढे केला आहे.

जागांसंबंधी एकमत नाही

युती झाल्यास काँग्रेसने कोणत्या जागा लढवायच्या यासंबंधी अद्याप एकमत झालेले नाही, असे दिसून येत आहे. काँग्रेसला तिच्या निवडीच्या जागा हव्या आहेत. मात्र, समाजवादी पक्ष सरसकट 15 ते 17 जागा देण्यात तयार आहे. काँग्रेसची मागणी 20 ते 25 जागांची आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

आठवड्यात निर्णय शक्य

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची युती होणार की नाही, तसेच युती झाल्यास कोणता पक्ष किती जागा लढविणार, यासंबंधीचा अंतिम निर्णय येत्या एक आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत परिस्थिती अधांतरी राहिल्यास नंतर युती होण्यास अडचण येण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये चित्र नेमकेपणाने स्पष्ट होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.