For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जत्रेपासून पाच दिवस ओटी स्वीकारणार नाही : गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस तैनात

02:45 PM Apr 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
जत्रेपासून पाच दिवस ओटी स्वीकारणार नाही   गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस तैनात
Advertisement

डिचोली : शिरगावातील श्री देवी लईराईच्या मंदिरात जत्रोत्सवानिमित्त होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच देवीचे दर्शन जलदगतीने होऊन लोकांची गर्दी लवकर मोकळी करण्यासाठी जत्रोत्सवाच्या दिवसापासून पाच दिवस मंदिरात ओटी स्वीकारली जाणार नाही. त्यासाठी जत्रेच्या पूर्वीच देवीची ओटी भरण्यासाठी विविध भागातून आलेल्या सुवासिनींची गर्दी वाढत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डिचोली पोलिसांची मंदिरात ड्युटी सुरू झाली आहे.

Advertisement

दरवर्षी मंदिरात जत्रोत्सवाच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. याच दिवशी भाविक सुवासिनी महिला देवीला आपली ओटी अर्पण करतात. परंतु ओटी अर्पण करण्याच्या प्रक्रियेत बराच वेळ जातो. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची तसेच धोंडगणांची मोठी गर्दी उसळत असते. दरवषी हाच प्रकार अनुभवण्यास येत असल्याने मंदिरात व मंदिराबाहेर गर्दी कमी व्हावी, यासाठी जत्रोत्सवापासून पाच दिवस ओटी भरून न घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

जत्रोत्सवाच्या एक दिवस अगोदर महिलांना ओटी भरण्याची संधी आहे. नंतर थेट कौलोत्सव संपून देवीचा कळस मंदिरात प्रवेश केल्यानंतर ओटी भरण्यास मिळणार आहे. हा निर्णय जाहीर केल्यानंतर देवीच्या मंदिरात सुवासिनी महिलांची मोठी गर्दी उसळली आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डिचोली पोलिसांची ड्युटी आतापासूनच सुरू झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.