For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शुभकारी कुणी बापा दुर्गतीस न जातसे

06:50 AM Jun 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
शुभकारी कुणी बापा  दुर्गतीस न जातसे
Advertisement

मनुष्य परमार्थसाधना करू लागला की त्याला त्याचे फळ लगेच हवे असते. मी एव्हढा जप करतो, देवाची पूजा करतो, देवाच्या दर्शनासाठी देवळात जातो पण मला अद्याप काहीच प्रत्यय आला नाही अशी त्याची तक्रार असते. त्यावेळी तो हे लक्षात घेत नाही की, एखादी पदवी मिळवायची असेल तर त्याला अठरा वर्षे अभ्यास करावा लागतो मग ज्या आत्मविद्येमुळे त्याचे आत्यंतिक कल्याण होणार असते, ती ताबडतोब आणि विनासायास कशी मिळेल? भगवंत म्हणतात, शास्त्रशुद्ध पद्धतीने, चिकाटीने योगाभ्यास केला तर यश निश्चित मिळते पण लोकांना मुळातच अभ्यासाचा कंटाळा असल्याने त्यांचे मन स्थिर होत नाही. हे ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात असा विचार आला की, समजा आत्मसिद्धी मिळवण्यासाठी देहसुखाचा म्हणजे विषयसुखाचा त्याग करून योगाभ्यासाबद्दल जी माहिती मिळाली असेल त्याच्या आधारे एखाद्याने श्रद्धेने तो सुरु केला तर त्याने केलेल्या योगाभ्यासाच्या प्रयत्नाचे त्याला कोणते फळ मिळते? म्हणून तो देवांना म्हणाला, योग्याने इंद्रियसुख तर आधीच सोडलेले असते पण योगाभ्यास अपुरा राहिलेल्या अवस्थेत त्याला मरण आले तर त्याच्या हाताला काहीच न लागल्याने तो फुटलेल्या ढगाप्रमाणे नाश पावतो की काय?

Advertisement

काय तो उभय-भ्रष्ट ब्रम्ह-मार्गी भुलूनिया । नाश पावे निराधार फुटलेल्या ढगापरी ।।38।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुनाने देवांना विचारले की, श्रद्धेच्या बलावर एखाद्याने योगाभ्यास सुरु केला पण अर्धवट माहितीमुळे तो अपुरा राहिला तर तो आत्मसिद्धीच्या गावालाही पोहोचत नाही आणि त्यास परतही येववत नाही अशा अवस्थेत जर त्याचे आयुष्य संपले तर पुढे त्याचे कसे होते? त्याने केलेला योगाभ्यास वाया जातो की काय?

Advertisement

पुढील श्लोकात तो म्हणतो, कृष्णा माझी शंका पूर्णतेने नाहीशी करण्याला तुझ्याखेरीज दुसरा कोणीही समर्थ आढळत नाही.

माझा संशय हा कृष्णा तू चि फेडी मुळातुनी । फेडीलसा दुजा कोणी न दिसे चि तुझ्याविण ।।39 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुन भगवंतांना म्हणाला, योगाभ्यास अर्धवट राहिलेल्या साधकाला विषयासक्तता व मोक्ष ह्या दोन्ही गोष्टी दूर राहतात तसेच आपल्यास आत्मप्राप्ती होईल ही आशाही त्याला सोडवत नाही. असा पुरुष मेला तर त्याला कोणती गती प्राप्त होते ते सांगा. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत म्हणतात, हे पार्था, इहलोकी अथवा परलोकी कोठेही त्याचा नाश होत नाही. कारण शुभकर्म करणारा कोणीही दुर्गतीला जात नाही.

न ह्या लोकी न त्या लोकी नाश तो पावतो कधी । शुभकारी कुणी बापा दुर्गतीस न जातसे ।। 40 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्षसुखाची उत्कट इच्छा आहे, त्याला ते मिळतेच पण मध्ये विसावा घ्यावा लागतो इतकेच. पण तो विसावा घेणेही असे सुखकर असते की तसे सुख इंद्रांदि देवांनाही मिळत नाही. जर त्याने अभ्यास जलद गतीने केला असता तर मरणकाळापूर्वीच त्याला ब्रह्मप्राप्ती झाली असती पण तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे थोडा विसावा घेतल्यानंतर मोक्ष त्याच्याकरता ठेवलेलाच असतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.