राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही
आमदार बसनगौडा पाटील : विशिष्ट समुदायाला खूश करण्यासाठी प्रियांक खर्गे यांचे विधान
बेंगळूर : जगातील कोणतीही शक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालू शकत नाही. संघाचे अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही, असे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी स्पष्ट केले. रविवारी मंड्या जिल्ह्यातील मद्दूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, प्रियांका खर्गे यांनी संघावर बंदी घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ही मूर्खपणाची बाब आहे. जवाहरलाल नेहरु यांच्यापासून आतापर्यंत सर्वांनी प्रयत्न केले आहेत. जगातील कोणतीही शक्ती संघावर बंदी घालू शकत नाही. सूर्याप्रमाणे संघालाही कुणी हात लावू शकत नाही. संघाचे अस्तित्व कोणीही मिटवू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाचे सदस्य विशिष्ट समुदायाला खूश करण्यासाठी अशी विधाने करतात. देशात न्यायालयीन व्यवस्था आहे. प्रियांक खर्गे विशिष्ट समुदायाला खूश करण्यासाठी अशी विधाने करतात. हिंदूंची यात्रा, उत्सव, शिवजयंती आणि गणेश उत्सवांवर हल्ले होत आहेत. या देशात एकच सत्य आहे, हिंदूंनी मुस्लिमांच्या सणांवर कधीही दगडफेक केलेली नाही. चुकीचे काम केलेल्यांवर गुन्हे दाखल करा. सरकारच्या दबावामुळे निष्पाप तऊणांवर गुन्हे दाखल केले जातात. आमचे सरकार असताना असे कृत्य केलेले नाही, असेही बसनगौडा पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रियांक खर्गेंकडून मूर्खपणाचे प्रदर्शन : विजयेंद्र
जबाबदारी पदावर असलेल्या प्रियांक खर्गे यांनी संघावर बंदी घालण्यासंदर्भात इतक्मया बेजबाबदार पद्धतीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहेत. हे त्यांच्या मूर्खपणाचे प्रदर्शन आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी म्हटले आहे. रविवारी बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, प्रियांक खर्गे यांनी संघावर बंदी घालण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आणि उपक्रमांबद्दल माहिती नसलेले आणि केवळ स्वत:च्या प्रसिद्धीसाठी बोलणारे लोक अशी विधाने करू शकतात. काँग्रेसने यापूर्वी दोन-तीन वेळा आरएसएसवर बंदी घातली होती. पण त्याच काँग्रेस पक्षाने बंदी मागे घेतल्याचे उदाहरण देशासमोर आहे. पुन्हा आरएसएसवर बंदी घालण्याचा अधिकार काँग्रेसकडे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.