कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
राज्यात एकीकडे गणेशोत्सवाची धुम सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकारणाची खलबते जोरदार सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव जनजागृतीसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी सुरू केला होता. मात्र सध्याच्या राजकारणाने समाजात, धर्मात आणि कुटुंबातच फुट पाडल्याचे बघायला मिळत आहे. लोकसभेला बारामती, धाराशीव येथील कौटुंबिक लढती गाजल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी तर थेट मुलीनेच आपल्या मंत्री असलेल्या वडिलांविरोधात दंड थोपटले आहेत. पवार, मुंडे, ठाकरे या राज्य पातळीवरील नेत्यांच्या घरातील राजकीय फुटीनंतर आता याचे पेव स्थानिक पातळीवर आले असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कुटुंबातच राजकीय लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबातील फुट समाज स्विकारत नसल्याचे बोलताना मी चुक केली तुम्ही चुक कऊ नका असे वक्तव्य केले होते, त्याला कारण होते. राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव आत्राम यांची मुलगी भाग्यश्रीने वडिलांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा दिलेला इशारा होता. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरूध्द सुनेत्रा पवार तर धाराशीव येथे अर्चना पाटील विरूध्द ओमराजे निंबाळकर यांच्यातील कौटुंबिक लढत बघता एकाच घरात दोन चुली झाल्याचे बघायला मिळाले.
गेल्या काही निवडणुका बघता भाऊ-भाऊ, काका-पुतणे अशा अनेक लढती झाल्या मात्र राज्यात पहिल्यांदा एका मुलीने आपल्या वडिलांविरोधात निवडणूक लढण्याचा दिलेला इशारा बघता राजकारण कोणत्या थराला चालले आहे, हे समजते. राज्यातील राजकारणात वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या अनेक लेकी आहेत ज्यांनी वडीलांचे नाव राजकारणात राखले. मग त्यात भावना गवळी, वर्षा गायकवाड, हिना गावित, प्रणीती शिंदे, पंकजा मुंडे, पुनम महाजन या साऱ्यांचा उल्लेख करावा लागेल. मात्र आता राजकारण इतक्या खालच्या थराला गेले आहे की, वडिलांच्या विरोधातच मुलीने दंड थोपटले. गेल्याचं आठवड्यात पुण्यात सख्ख्या बहिणीने आपल्या सख्य्या भावाचा खून वर्चस्व वादातून केला.
राजकीय वर्चस्वाची इर्षा इतकी वाढली आहे की, त्याला कोणत्याही नात्याची मर्यादा राहिली नसल्याचे दिसत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बीड जिह्यातीलच दोन कौटुंबिक निवडणुका गाजल्या, त्यात एक पंकजा मुंडे विरूध्द धनंजय मुंडे तर दुसरी जयदत्त क्षिरसागर विरूध्द संदीप क्षिरसागर यांच्यातील मात्र यंदाच्या विधानसभेला राजकीय स्पर्धा वाढली असून, विधानसभा निवडणुकीला अवकाश असतानाच दंड थोपटायला सुरूवात झाली आहे. धर्मराव आत्राम यांच्या मुलीनंतर दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या विरोधात त्यांचे चुलत भाऊ अनिकेत कदम यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. लोकसभेला गजानन किर्तीकर विरूध्द अमोल किर्तीकर असा पिता-पुत्रांचा सामना होता होता राहिला.
आता यंदाच्या विधानसभेला मात्र सगे सोयऱ्यांमध्येच एकमेकांच्या विरोधात निवडणूक रंगणार असल्याचे सध्याचे राजकीय वातावरण बघता दिसत आहे. एकीकडे सांगलीतील दोन टर्म आमदार असलेल्या भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे उमेदवारी न मागण्याचा निर्णय घेताना, माणसाने कधी तरी थांबले पाहिजे असा निर्णय पक्षाकडे कळविताना आत्ताच्या राजकारण्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. नाही तर चार चार पाच टर्म आमदारकी घेऊन पुन्हा विकासाच्या गोंडस नावाखाली जनतेची दिशाभूल करायची पक्षांतर करायचे त्यांच्यासाठी जिव्हाळा या मराठी चित्रपटातील ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेल्या गाण्याच्या ओळी आठवतात,
लळा जिव्हाळा शब्दच खोटे
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
रक्तही जेथे सुड साधते तेथे कसली माया
कोण कुणाची बहीण भाऊ पती पुत्र वा जाया
सांगायची नाती सगळी जो तो अपुले पाही
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
लालबागच्या राजाच्या चरणी शहा पवार
लालबागचा राजा नवसाला पावतो, या राजाला नवस बोलण्यासाठी देशभरातून भाविक गणेशोत्सव काळात मुंबईला येतात, सोमवारी मात्र एकाच दिवशी दोन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी या राजाच्या चरणी हजेरी लावली. भाजप नेते अमित शहा हे दरवर्षी राजाच्या दर्शनाला येतात, मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लावलेली हजेरी ह्याचीच विशेष चर्चा आहे. पवार हे कधी गणेशोत्सवाच्या मंडळाना भेटी देत नाहीत, कोरोना काळात लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. त्यावर्षी राज्यातील कोरोनाची परिस्थिती बघता लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने महिनाभर आयोजित केलेल्या आरोग्य उत्सवाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. हा अपवाद वगळता पवार कधी लालबागच्या राजाला आले नाहीत. मात्र सध्या धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण जोरात सुरू आहे. कोणता नेता कोणत्या कार्यक्रमाला हजेरी लावेल हे सांगता येत नाही.
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलले आहे. राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार हे सध्या गणपती बाप्पा पण सांगू शकत नाहीत असे राज्याचे राजकीय चित्र आहे. रविवारी अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भाजपच्या राज्यातील नेत्यांनी 160 जागांची मागणी केली असून 125 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण बदलले असून दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपकडे यापूर्वीच 100 जागांची मागणी केली आहे. मग अजित पवारांना भाजप किती जागा देणार आणि आपल्या सोबतच्या मित्रपक्षांना किती जागा सोडणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 2019 ला भाजपने 164 जागा लढवताना 105 जागा जिंकल्या होत्या, तर उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेने 124 जागा लढविताना 56 जागा जिकंल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर स्थानिक पातळीवर बंडखोरांना रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. आत्राम यांच्या मुलीच्या बंडानंतर आता वडगाव शेरी मतदार संघातील माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी तुतारी घेऊन राष्ट्रवादीचे सुनिल टिंगरे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे तर भाजपकडून 2019 ला विधानसभेची निवडणूक लढविलेले गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला असून ते 13 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीसमोर आऊटगोईंग रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
प्रवीण काळे