For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुणीच घाबरण्याची गरज नाही : पंतप्रधान

06:55 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुणीच घाबरण्याची गरज नाही   पंतप्रधान
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवरील ईडी-सीबीआयच्या कारवाईपासून इलेक्टोरल बाँडवर उघडपणे भूमिका मांडली आहे. माझ्याकडे मोठ्या योजना आहेत, माझे निर्णय कुणाला घाबरविण्यासाठी किंवा दडपण्यासाठी नाहीत तर देशाच्या विकासासाठी आहेत, असे मोदींनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. एक देश एक निवडणूक आमची प्रतिबद्धता आहे, अनेक लोकांनी समितीला स्वत:च्या सूचना केल्या आहेत. अत्यंत सकारात्मक आणि नवोन्मेषी सूचना प्राप्त झाल्या आहेत. आम्ही हा अहवाल लागू करू शकलो तर देशाला मोठा लाभ होईल असे मोदींनी नमूद केले आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना मोदींनी विरोधी पक्षांकडून मतपेढीच्या राजकारणासाठी या मुद्द्याचा अस्त्राप्रमाणे वापर करण्यात आला आणि वारंवार हा मुद्दा भडकविण्यात आल्याचा आरोप केला आहे. राम मंदिराचा मुद्दा न्यायालयासमोर असताना याप्रकरणी निर्णय येऊ नये अशाप्रकारचे प्रयत्न केले गेले. विरोधी पक्षांसाठी हे एक राजकीय अस्त्र होते. आता राम मंदिराची उभारणी झाल्याने त्यांच्या हातून हा मुद्दा निसटला असल्याची टिप्पणी मोदींनी केली आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदींना तपास यंत्रणांविषयी प्रश्न विचारण्यात आला. विरोधी पक्ष केवळ स्वत:च्या पराभवाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पराभवासाठी थेट स्वत:ला जबाबदार ठरविले जाऊ नये असा विरोधी पक्षांचा प्रयत्न सुरू आहे. तपास यंत्रणांनी ज्यांच्यावर कारवाई केली, त्यातील 97 टक्के लोक हे राजकारणाशी संबंधित नाहीत. ईडी, सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यासंबंधीचा एकही कायदा माझ्या सरकारने लागू केलेला नाही. याउलट निवडणूक आयोगात सुधारणा माझ्या सरकारकडून करण्यात आली. यापूर्वी काँग्रेसचे सरकार असताना एका ‘परिवारा’च्या निकटवर्तीयांना निवडणूक आयुक्त करण्यात आले, ज्यानंतर त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व आणि मंत्रालयही मिळाले, भाजप अशाप्रकारचे राजकारण करू शकत नाही असे मोदींनी म्हटले आहे.

एलन मस्क भारत समर्थक

टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्याकडून होणाऱ्या गुंतवणुकीबाबत मोदींना विचारणा झाली. पैसा कुणाचाही असो, श्रमबळ माझ्या देशाचे असायला हवे. एलन मस्क मोदी समर्थक असणे एक गोष्ट आहे, परंतु तो मूलत्वे भारतसमर्थक आहे. त्याने भारतात गुंतवणूक करावी, यामुळे आमच्या देशातील युवांना रोजगार मिळणार असल्याचे मोदींनी उत्तरादाखल म्हटले आहे.

राहुल गांधींच्या विचारांमध्ये विरोधाभास

सध्या कुठलीच प्रतिबद्धता आणि जबाबदारी नसलेली वक्तव्ये आम्ही पाहत आहोत. एका नेत्याच्या प्रत्येक विचारात विरोधाभास असतो. या नेत्याचे भाषण ऐकल्यावर लोकांना तो डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वाटते. अलिकडेच एका राजकीय नेत्याने एका झटक्यात गरिबी हटविणार असे म्हटले होते. ज्या पक्षाला 5-6 दशकांपर्यंत सत्तेवर राहण्याची संधी मिळाली, तो जेव्हा असे म्हणू लागतो, तेव्हा तो नेमका काय म्हणतोय असा प्रश्न देशाला पडतो असे उद्गार मोदींनी राहुल गांधी यांच्यासंबंधी काढले आहेत.

2047 चा उत्सव

2047 साली देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. अशा स्थितीत देशात एक प्रेरणा जागृत व्हायला हवी. एकीकडे 2047 हे एक महापर्व आहे आणि याला उत्सवाच्या स्वरुपात साजरे करण्यात यावे असे विधान मोदींनी केले आहे.

इलेक्टोरल बाँडवरून असत्याचा प्रचार

विरोधी पक्षांनी इलेक्टोरल बाँड याजनेवरून खोटा प्रचार चालविला आहे. इलेक्टोरल बाँड योजनेचा उद्देश निवडणुकीत काळ्या पैशाच्या वापरावर अंकुश लावणे होता आणि विरोधी पक्ष आरोप करून पळ काढू पाहत आहेत. तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर ज्या 16 कंपन्यांनी देणगी दिली, त्यातील केवळ 37 टके रक्कम भाजपला आणि 63 टक्के रक्कम विरोधी पक्षांना मिळाली आहे. इलेक्टोरल बाँड रद्द झाल्याने निवडणुकीत देशाला ‘काळ्या पैशा’च्या दिशेने लोटण्यात आले असून इलेक्टोरल बाँडला विरोध करणारे याचा पुढील काळात पश्चाताप करतील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

मोदी की गॅरंटी

जेव्हा मी मोदी की गॅरंटी म्हणतो, तेव्हा त्याची जबाबदारी स्वीकारतो. लोकांना देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो. राजकीय नेतृत्व लोकांच्या नजरांमध्ये संशयास्पद होत चालले आहे. अशा स्थितीत आमच्या देशात प्राण जाए पर वचन न जाएची परंपरा राहिल्याचे आठवणीत ठेवावे लागेल. मी जे बोलतो, ती माझी जबाबदारी आहे आणि मी जनतेला याची गॅरंटी दिली आहे. कलम 370 रद्द करणे ही आमच्या पक्षाची प्रतिबद्धता होती आणि ती आम्ही पूर्ण केली. आता जम्मू-काश्मीरचे भाग्यच बदलले आहे. तीन तलाक प्रकरणी यापूर्वीच्या राजकीय नेतृत्वाने माघार घेतली होती. परंतु आम्ही ही कुप्रथा संपुष्टात आणली. यामुळे लोक आता पुन्हा विश्वास ठेवू लागले आहेत. भारतासारख्या देशात या विश्वासाला मी स्वत:ची जबाबदारी मानतो. याचमुळे मी वारंवार मोदी की गॅरंटी म्हणत असतो असे उद्गार मोदींनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.