नवे शैक्षणिक वर्ष 7 पासून नकोच
मडगावातील जाहीर सभेत प्रखर विरोध
मडगाव : येत्या 7 एप्रिलपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात करण्याच्या शिक्षण खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले जाणार असल्याची माहिती एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्यास विरोध करणाऱ्या पालकांच्या वतीने सेसिल रॉड्रिग्स यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. मडगावात काल रविवारी एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्यास विरोध करणाऱ्या पालकांची जाहीर सभा झाली. एप्रिल महिना प्रचंड गर्मीचा ठरणार असून आम्हाला आमच्या मुलांची काळजी आहे. त्यामुळे सरकारने पालकांच्या भावना समजून घ्यायला पाहिजे होत्या. मात्र, सरकार काहीच ऐकून घेण्यास तयार नाही. 7 एप्रिलपासून शाळा सुरू करणार असल्याची अधिसूचना शिक्षण खात्याने जारी केली आहे.
त्याला आता न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे सेसिल यांनी स्पष्ट केले. आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्यास विरोध करणाऱ्या पालकांनी एक निवेदन दक्षिण गोव्याचे खा.कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना सादर केले असून आपण हे निवेदन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना सादर करणार असल्याचे त्यांनी जाहीर सभेत सांगितले. गोव्यात जून महिन्यात शाळा सुरू करण्याची गेल्या कित्येक वर्षांची परंपरा कायम असून ही परंपरा तशीच कायम ठेवावी, नव्या शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली विनाकारण कोवळ्या मुलांना त्रास देऊ नका असे आवाहन खा. कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी या जाहीर सभेत बोलताना केले. आमच्या मुलांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार यांना कुणी दिला असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सरकारवर कसा अंकुश ठेवावा
भाजप सरकार कुणाचेच ऐकून घेत नाही. कुणाच्याच मताला किंमत देत नाही. या ठिकाणी हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला. आम्ही सरकारवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत असलो तरी आम्हाला म्हणावे तेव्हढे यश आलेले नाही. त्यामुळे सर्वांनी संघटीत होण्याची गरज असून सर्वजण संघटीत झाले तर नक्कीच सरकारवर अंकुश येईल, असेही ते म्हणाले.
7 एप्रिलपासून पालकांचे आंदोलन
शिक्षण खात्याने 7 एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्षे सुरू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्याच दिवसापासून पालकांनी आंदोलन करावे असे आवाहन बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी केले व त्याला पालकांनी प्रतिसाद दिला.
शाळांना साधनसुविधाच नाही
केंद्रीय बोर्डाशी संलग्न असलेल्या गोव्यातील शाळांचे वर्ग हे एप्रिलमध्ये सुरू होत असतात. मात्र, या शाळांना आवश्यक सर्व साधनसुविधा आहेत. मात्र, गोव्यातील बहुसंख्य शाळांनी एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्यासारख्या साधनसुविधा नसल्याचे वेळ्ळीचे आमदार व्रुझ सिल्वा म्हणाले. शाळांनी अगोदर आवश्यक साधनसुविधा उपलब्ध कराव्यात व नंतरच नवीन शैक्षणिक धोरण राबवावे. विनाकारण मुलांना व पालकांना त्रास देऊ नये असे सिल्वा म्हणाले. एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आपण लक्षवेधी सूचना मांडली होती. परंतु, आपली लक्षवेधी सूचना विचारात घेण्यात आली नाही असे ते म्हणाले. यावेळी अनेक पालकांनी आपली मते मांडताना एप्रिलमध्ये शाळा नकोच असल्याचे स्पष्ट केले. जर एप्रिलमध्ये शाळा सुरू केल्या तर त्याला विरोध केला जाणार असल्याचे स्पष्ट केले.