For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोकुळमध्ये ‘मविआ’चा चेअरमन नको

10:42 AM May 16, 2025 IST | Radhika Patil
गोकुळमध्ये ‘मविआ’चा चेअरमन नको
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळमध्ये महाविकास आघाडीचा चेअरमन नको, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन पाहिजे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चेअरमन पदाचा राजीनामा देऊ नका, अशी सूचना केली आहे. त्यानुसार चेअरमन पदाचा राजीनामा देणार नसल्याचे गोकुळ चेअरमन अरुण डोंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

चेअरमन डोंगळे म्हणाले, गोकुळमध्ये पक्षीय राजकारण नसले तरी सध्या आम्ही महायुतीच्या राजकीय प्रवाहात आहोत. जिल्ह्यातील नेत्यांच्या सुचनेनुसार चेअरमन पदाचा राजीनामा देणार होतो. मात्र माझ्या राजीनाम्यानंतर गोकुळमध्ये मविआचा चेअरमन होणार याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना मिळाली. त्यांनी तत्काळ मुंबईत सह्याद्रीवर बोलावले. गोकुळवर महायुतीचा चेअरमन पाहिजे अशी त्यांनी सूचना केली. राज्य शासनाच्या मदतीने गोकुळची प्रगती केली आहे. पुढील वर्षभरातही राज्य शासनाला अंगावर घेऊन गोकुळची प्रगती करणे अशक्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार गोकुळच्या चेअरमन पदाचा राजीनामा देणार नाही आहे.

Advertisement

  • संचालक मंडळ बैठकीला रजा कळवली

गोकुळमध्ये आजपर्यंत वरिष्ठ नेत्यांचा अदृश सहभाग होता. आता तो उघडपणे आहे. आजच्या संचालक मंडळ बैठकीला वैयक्तिक कारणामुळे रजा कळवली आहे. आजच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला जाणार होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसारच राजीनामा देणार नसल्याचे चेअरमन डोंगळे यांनी स्पष्ट केले.

  • अविश्वास ठराव आणल्यास नेते बघतील

राज्य सरकारच्या मदतीशिवाय गोकुळसारख्या मोठ्या संस्थेमध्ये काही करता येत नाही. सरकारच्या विरोधात गेल्यास गोकुळला अडचणी येऊ शकतात. म्हणूनच वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा न देण्याबाबत केलेल्या सूचनेप्रमाणे पदाचा राजीनामा दिलेला नाही. संचालक मंडळ बैठकीत अविश्वास ठराव आणल्यास त्याबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते बघून घेतील.

  • महायुतीचा चेअरमन पाहिजे

गोकुळमध्ये चेअरमन मीच असावे असा वरिष्ठ नेत्यांचा आग्रह नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक पार्श्वभूमीवर महायुतीचा चेअरमन गोकुळमध्ये पाहिजे आहे. त्यामुळे महायुतीचा चेअरमन कोण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे एकत्रित निर्णय घेतील असेही चेअरमन डोंगळे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.