अमेरिकेकडून कोणतीही सूचना नाही
गौतम अदानींवरील आरोपप्रकरणी केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उद्योगपती गौतम अदानी यांच्यासंबंधी अमेरिकेकडून भारताला आधी कोणतीही सूचना करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दिले आहे. तसेच अदानी यांच्या नावाने अद्याप कोणतेही समन्स किंवा वॉरंट भारतात आलेले नाही, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. ते एका विशेष पत्रकार परिषदेत येथे शुक्रवारी पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वालही होते.
अमेरिकेत अदानींच्या विरोधात जी कारवाई होत आहे ती एका न्यायालयाने एका खासगी व्यक्तीच्या विरोधात चालविलेsली कारवाई आहे. आजमितीस या कारवाईशी भारत सरकारचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे भारताने सध्या याविषयी काही पावले उचलण्याची आवश्यकता नाही. अशी माहिती परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याच पत्रकार परिषदेत दिली. अदानी प्रकरणी मिळत असलेल्या माहितीत स्पष्टता नाही. त्यामुळे अधिकृतरित्या भारताशी संपर्क झाल्याशिवाय विषयावर प्रतिक्रिया दिली जाणार नाही, असे स्पष्ट पेले गेले.
रीत काय आहे...
जेव्हा एखाद्या देशाचे न्यायालय त्या देशात वास्तव्यास नसलेल्या दुसऱ्या देशाच्या नागरीकाविरोधात समन्स किंवा वॉरंट काढते, तेव्हा ते त्या देशाच्या परराष्ट्र विभागाच्या माध्यमातून लागू करावे लागते. ते थेट न्यायालयाकडून त्या नागरीकाला लागू केले जात नाही. त्यामुळे भारताच्या सरकारला टाळून ते लागू केले जाऊ शकणार नाही. अद्याप अमेरिकेने तसा कोणताही संपर्क भारताशी केलेला नाही.
अदानींकडून आरोपांचा इन्कार
गौतम अदानी आणि अदानी उद्योगसमूह यांनी त्यांच्यावरील आरोपांचा ठाम इन्कार केला आहे. कोणत्याही प्रकारचे लाचलुचपतीचे व्यवहार करण्यात आलेली नाहीत. केवळ संशयाच्या आधारावर कोणाला दोषी मानले जाऊ शकत नाही. अदानी उद्योगसमूह अमेरिकेतील कारवाईच्या विरोधात आवश्यक ते सर्व कायदेशीर पर्याय उपयोगात आणणार आहे. अदानींवरील आरोप मागे घेतले जाण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे वक्तव्य या उद्योकसमूहाने केले आहे.
अदानींच्या वकीलांचे प्रतिपादन
गौतम अदानी किंवा त्यांचे कोणी कुटुंबीय यांच्यावर अमेरिकेतल्या प्रकरणात थेटपणे कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नाही. तसेच त्यांच्यावर ठपकाही ठेवण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण अदानींच्या वतीने ज्येष्ठ कायदेदज्ञ महेश जेठमलानी यांनी दिले होते, ही बाब महत्वाची मानण्यात येत आहे. त्यामुळे अदानी यांच्याविरोधात नेमकी कशाप्रकारे कारवाई होत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ती स्पष्टता येण्यासाठी काही काळ जाण्याची आवश्यकता असून येत्या काही दिवसांमध्ये स्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
विरोधकांचा गदारोळ
अदानी यांच्याविरोधातील अमेरिकेतल्या कारवाईवरुन भारतात मोठा राजकीय गदारोळ उठला आहे. अदानी यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी यांचा संरक्षण देत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. सध्या संसदेचे शीतकालीन अधिवेशन होत असून या अधिवेशनाचा संपूर्ण पहिला आठवडा कोणतेही कामकाज न होता, अदानींच्या मुद्द्यावर वाया गेला आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या आघाडीतच आता या मुद्द्यावर मतभेद झाले असून अदानी मुद्द्यावर काँग्रेसने विशेष भर देऊ नये. त्याचा कोणताही राजकीय लाभ होणार नाही, असे मत विरोधी पक्षांच्या आघाडीतील काही पक्षांनी नोंदविले आहे. त्यामुळे काँग्रेसही या विषयावर यापुढे विशेष जोर लावणार नाही, अशी अटकळ अनेकांनी व्यक्त केली आहे.