दोन्ही हात नाहीत, तरीही दगडफेकीचा गुन्हा
पाकिस्तानात काहीही घडू शकते
पाकिस्तान खरोखरच अजब देश आहे, अलिकडेच इम्रान खान यांच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनांनंतर पोलिसांनी एका अशा व्यक्तीला अटक केली, ज्याला दोन्ही हात नाहीत, त्याच्यावरच पोलिसांनी दगडफेक अन् लाठ्यांनी हल्ला करण्याचा आरोप केला आहे. परंतु न्यायालयात हे प्रकरण पोहोचताच पूर्णपणे पालटले आहे. इस्लामाबादमध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांच्या मुक्ततेच्या मागणीसाठी निदर्शने झाली. यादरम्यान पोलिसांनी अनेक लोकांना अटक केली, यात लतीफ उल्लाह सदोजई नावाचा एक इसमही सामील होता, ज्याला दोन्ही हात नाहीत. नंतर न्यायालयाने याप्रकरणी त्याची मुक्तता केली आहे. करपा पोलीस स्थानकात नोंद एफआयआरमध्ये पोलिसांनी लतीफ उल्लाह सदोजई विरोधात निदर्शनांदरम्यान दगडफेक करण्याचा आरोप केला. पोलिसांनी त्याला अटक करत तीन दिवसांची कोठडी प्राप्त केली होती.
न्यायालयात काय घडले?
प्रकरण तेव्हा अजब ठरले, जेव्हा न्यायदंडाधिकारी रिजवान-उद-दीन यांच्यासमोर लतीफ यांना हजर करण्यात आले. माझ्या अशीलाला दोन्ही हात नाहीत, अशा स्थितीत तो पोलिसांवर दगडफेक करणे आणि लाठीने हल्ला कसा करू शकतो असा युक्तिवाद त्याचे वकील सरदार मारुफ यांनी केला. सुनावणीदरम्यान न्यायालयात लतीफ उल्लाहचे शारीरिक परीक्षण करण्यात आले.
निदर्शनानंतर मी तलागंग येथे परतत होतो, याचदरम्यान पोलिसांनी माझे वाहन रोखून झडती घेतली आणि वाहनातीलइतर लोकांसोबत मलाही अटक केली. मला दोन्ही हात नसताना मी दगडफेक कशी करू शकतो? पोलिसांना मी वारंवार स्वत:च्या शारीरिक स्थितीविषयी सांगितले, परंतु याकडे पोलिसांनी दुर्लक्षच केल्याचे लतीफ यांचे सांगणे आहे. न्यायालयात शारीरिक परीक्षणानंतर लतीफ उल्लाहला दोन्ही हात नसल्याची पुष्टी झाली. यानंतर न्यायालयाने त्याची या प्रकरणातून मुक्तता केली आहे. याप्रकरणात दोन्ही हात नसतानाही पोलिसांनी त्याच्यावर दगडफेक अन् लाठीने हल्ला करण्याचा आरोप केला होता यामुळे हे चर्चेत आले आहे.