For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधींच्या रोड शोत हिरव्या झेंड्यांना फाटा

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधींच्या रोड शोत हिरव्या झेंड्यांना फाटा
Advertisement

वृत्तसंस्था /वायनाड

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड मतदारसंघात प्रचाराला प्रारंभ केला आहे. गुरुवारी त्यांनी रोड शो केला. मात्र या रोड शोमध्ये हिरव्या रंगाच्या झेंड्यांना फाटा देण्यात आला होता. त्यामुळे एकही हिरवा झेंडा दिसून आला नाही. केरळमध्ये काँग्रेसची मुस्लीम लीगशी युती आहे. मुस्लीम लीगचा झेंडा हिरवा आहे. पण रोड शोमध्ये या झेंड्याचे अस्तित्वसुद्धा नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे. हिरवा झेंडा लावण्याचे धाडसही काँग्रेस दाखवू शकत नाही. अशी उपहासगर्भ टीका विरोधकांच्या आघाडीतीलच असणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केल्याने या आघाडीतील विसंगतीही उघड झाली आहे. राहुल गांधींच्या रोड शोमध्ये हिरव्या रंगाचा झेंडा नव्हता. याचा अर्थ ते आता सौम्य हिंदुत्वाकडे वळले आहेत काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. पण वायनाड हा मतदारसंघ मुस्लीमबहुल आहे. तेथेही हिरवा झेंडा न मिरविल्याने तो आणखीनच चर्चेचा विषय झाला आहे. काँग्रेसने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

डाव्यांनी साधला निशाणा

Advertisement

काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला घाबरुन हिरवा झेंड्यापासून फारकत घेतली आहे, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी काँग्रेसवर यासाठी उपहासगर्भ टीका केली. काँग्रेस भारतीय जनता पक्षासमोर उभी राहू शकत नाही. त्यामुळे आता ती हिरव्या झेंड्यापासूनही दूर जात आहे. हीच या पक्षाची धर्मनिरपेक्षता आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. यावर, डाव्या पक्षांचीच भारतीय जनता पक्षाशी अंत:स्थ युती आहे. त्यामुळे ते विरोधकांच्या आघाडीतले असूनही काँग्रेसला कमजोर करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले. मात्र, हिरवा झेंडा गायब का, याचे स्पष्ट उत्तर काँग्रेसने अद्यापही दिलेले नसल्याने चर्चेचा बाजार गरम आहे.

Advertisement
Tags :

.