यापुढे गोव्यात जमिनीचे रुपांतरण नाही
नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांची ग्वाही, साकोर्डा वाघाच्या मृत्यूबाबत मागविला अहवाल
पणजी : यापुढे गोव्यात जमिनीचे रुपांतरण होणार नाही, अशी ग्वाही नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. तसेच काही रुपांतरीत करण्यात आलेल्या जमिनी पुन्हा परावर्तीत करून ‘एनडीझेड’ करण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तथापि नेमक्या कोणत्या जमिनींचे रुपांतर होणार नाही, याचा स्पष्ट खुलासा मात्र त्यांनी केलेला नाही. काल मंगळवारी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी सांगितले की, साकोर्डा येथे वाघाचा मृतदेह सापडला असून त्याचा परिपूर्ण अहवाल आपण मागवला आहे.
प्रधान मुख्य वनरक्षकांना तशी सूचना देण्यात आली असून तो अहवाल आल्यानंतर पुढील कृती करण्यात येणार आहे. गोव्यातील काही भाग व्याघ्रक्षेत्र राखीव करण्याबाबत आपण जास्त काही बोलू शकत नाही. कारण तो विषय न्यायप्रविष्ट आहे, असेही ते म्हणाले. सुरक्षित आणि कायदेशीर अन्न पदार्थांचे सेवन व वाहतुकीस अनुमती असून त्यासाठी अन्न-औषध प्रशासनाला कारवाईचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. एफडीए चांगले काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी लक्ष दिल्यास सर्व काही नियंत्रणात राहील, असे राणे यांनी नमूद केले.
ध्येयवादी नेतृत्वामुळे भाजपचा विजय
विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील निकालांवर बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप केंद्रीय नेते मंडळींच्या ध्येयवादी नेतृत्वामुळे हा विजय संपादन झाल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे निवडणूक निकालातून दिसून येत असल्याचे ते म्हणाले.