‘अप्रेंटिस’ना वेतन देण्यास निधी नाही?
पणजी : सरकारच्या विविध खात्यात शिकाऊ कामगार अप्रेंटिस म्हणून घेतलेल्या नवोदित हंगामी कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. शिक्षण खात्यामध्ये घेण्यात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना ऑगस्टपर्यंतचे मानधन देण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याचे मानधन निधी अभावी देण्यात आले नाही. आता नोव्हेंबर संपुष्टात येताना तरी या महिन्याचे वेतन पुढील महिन्यात मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचा दावा अनेक अधिकारीवर्ग सध्या करीत आहेत. खात्यात निधी आल्यानंतर वेतन देऊ, असे आश्वासन विविध खाते प्रमुखांनी या हंगामी कर्मचाऱ्यांना दिले आहे. या हंगामी कर्मचाऱ्यांना नाममात्र मानधन दिले जाते. तरीदेखील तेवढे मानधन देण्याएवढा निधी सरकारच्या विविध खात्यामध्ये नसल्याचे आढळून आले आहे. त्याचा परिणाम या कर्मचारीवर्गावर झाला आहे.