उड्डाणपूल नको, समुद्रालगत रस्ता हवा!
रत्नागिरी :
रेवस - रेड्डी सागरी महामार्गातील नियोजित उड्डाणपुलाऐवजी समुद्र किनाऱ्यालगत रस्ता तयार करण्यात यावा. हा रस्ता गावाची संरक्षक भिंत म्हणून काम करेल आणि गावात पर्यटनाचाही विकास होईल, या मागणीचे 650 ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी तसेच प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्याकडे सादर करण्यात आले
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी रेवस - रेड्डी सागरी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मिऱ्या-काळबादेवी खाडीवरील पुलाला जोडून उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. हा उड्डाणपूल बसणी-साखरतर रस्त्याला जोडण्यासाठी प्रस्तावित आहे. उड्डाणपुलाऐवजी मिऱ्या - काळबादेवी पुलाला लागून समुद्रालगत आरे गावापर्यंत रस्ता प्रस्तावित करावा, अशी मागणी काळबादेवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने 20 ऑगस्ट 2024 रोजी केली होती. या संदर्भात गावातील 650 ग्रामस्थांनी स्वाक्षरी केलेले निवेदन शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे दिले.
सध्या प्रस्तावित उड्डाणपुलासाठी काळबादेवी परिसरात माती परीक्षण सुरू आहे. अशाच पद्धतीने गावातून जाणाऱ्या रस्त्यासाठीही परीक्षण करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी काळबादेवी सरपंच तृप्ती पाटील, अॅड. अविनाश शेट्यो, माजी सरपंच पृथ्वीराज मयेकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप जोशी, ग्रामपंचायत सदस्य मधुरा आरेकर आणि प्रिती मयेकर तसेच काळबादेवीतील ग्रामस्थ उपस्थित होते.