For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाकाय कॅसिनोला मांडवीत ‘नो एंट्री’

02:54 PM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाकाय कॅसिनोला मांडवीत ‘नो एंट्री’
Advertisement

मुंबई उच्च न्यायालयाचा कंपनीला सक्त आदेश : मांडवी प्रवेशासाठी कोर्टाची परवानगी आवश्यक

Advertisement

पणजी : उच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी आणि सक्षम प्राधिकरणांकडून आवश्यक असलेल्या सर्व अनिवार्य परवानग्या, प्रमाणपत्रे व लायसन्स प्राप्त केल्याशिवाय हे जहाज मांडवी नदीमध्ये आणले जाणार नसल्याचे संबंधित कॅसिनो कंपनीने न्यायालयासमोर पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. स्वातंत्र्यसैनिक तथा पद्मश्री पुरस्कार विजेत्या लिबिया लोबो सरदेसाई, साहित्यिक उदय भेंब्रे, सामाजिक कार्यकर्ता सुदीप ताम्हणकर आणि मच्छीमार हरीश मडकईकर या चार याचिकादारांनी ‘इनफ इज इनफ असोसिएशन’तर्फे मांडवी नदीत नवीन भव्य कॅसिनो जहाजाच्या प्रवेशाला प्रतिबंध घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्या. वाल्मिकी मिनेझिस आणि न्या. अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठासमोर बुधवारी  कॅसिनो  जहाजावरील याचिका सुनावणीस आली असता, संबंधित कॅसिनो कंपनीच्या यापूर्वीही ऑपरेटरने न्यायालयाला कळवले होते की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे जहाज मांडवीमध्ये प्रवेश करणार नसल्याचा पुनऊच्चार केला.

जहाज मुरगाव बंदरात बर्थ क्र. 4 वर

Advertisement

सध्या कंपनीने मुरगाव येथे जहाजाच्या तात्पुरत्या थांबण्याची (नांगरण्याची) व्यवस्था केली आहे. सुमारे 2,000 प्रवाशांना सामावून घेण्याच्या क्षमतेने डिझाइन करण्यात आलेले हे 112 मीटर लांबीचे जहाज, मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या बर्थ क्रमांक 4 वर नांगरण्यात आले आहे. पावसाळ्याच्या कालावधीत हे जहाज तिथेच राहण्याची अपेक्षा आहे. या काळात त्यावर देखभालीची कामे, किरकोळ बदल, कागदपत्रांची पूर्तता आणि समुद्रात चालवण्यास ते योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी ‘सी ट्रायल्स“ (समुद्री चाचण्या) केल्या जातील, असे कंपनीचे वकील निखिल साखरदांडे यांनी नमूद केले.

जहाजाला सर्वेक्षण प्रमाणपत्रच नाही

सदर 2,000 प्रवाशांना सामावून घेण्याऱ्या जहाजाला आवश्यक असलेले ‘सर्टिफिकेट ऑफ सर्व्हे“ (सर्वेक्षण प्रमाणपत्र) मिळाले नसल्याची कबुली कंपनीचे वकील निखिल साखरदांडे यांनी न्यायालयापुढे दिली. त्यावर  सर्व आवश्यक प्रमाणपत्रे प्राप्त केल्याशिवाय, सदर जहाजाने पणजी बंदरात अर्थात मांडवी नदीमध्ये प्रवेश करू नये. तसेच, जरी पणजी बंदरात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेली अशी प्रमाणपत्रे आणि पूर्तता प्राप्त करण्यात आली असली, तरीही या न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय सदर जहाजाने बंदरात प्रवेश करू नये, असा कडक आदेश उच्च न्यायालयाने दिला.

मांडवीत नवीन कॅसिनो येणार नाही : मुख्यमंत्री

मांडवी नदीमध्ये कोणतेही नवीन कॅसिनो जहाज किंवा नवीन कॅसिनो परवाना दिला जाणार नाही, असा पुनऊच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. आपण पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, राज्य सरकार गोव्यात कोणताही नवीन कॅसिनो आणत नाही. जुन्या जहाजाच्या जागी मोठे जहाज आणण्याचा जो प्रस्ताव कंपनीने दिला होता, तो तांत्रिक कारणास्तव आम्ही नाकारला असून त्यांना त्यात सुधारणा करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने 2026 च्या अर्थसंकल्पात नवीन कॅसिनो शुल्कात मोठी वाढ केली असून, सध्या अस्तित्वात असलेल्या 6 ऑफशोअर कॅसिनो व्यतिरिक्त कोणत्याही नवीन कॅसिनोला या क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही, असे धोरण स्वीकारले आहे.

Advertisement
Tags :

.