मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप निर्णय नाही : के. जे. जॉर्ज
बेंगळूर : राज्यात मुख्यमंत्री बदल किंवा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. हा विषय हायकमांडच्या कक्षेत येतो, असे ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी सांगितले. तुमकूर जिल्ह्याच्या अरसीकेरे तालुक्यातील आगुंद येथे नव्या वीज वितरण उपकेंद्राचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. हासनचे काँग्रेस खासदार श्रेयस एम. पाटील यांनी अरसीकेरेचे आमदार शिवलिंगेगौडा यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना के. जे. जॉर्ज यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे सांगितले. आमदार शिवलिंगेगौडा हे अपराजित नेते आहेत. त्यांना मंत्रिपद देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री, प्रदेश काँग्रेस समिती आणि हायकमांड घेईल. मुख्यमंत्री बदलाबाबत अफवा पसरल्या आहेत. हायकमांडकडून या मुद्द्यावर कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. काँग्रेसमध्ये हायकमांडचा निर्णयच अंतिम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.