मोले सरपंचांविरोधात अविश्वास ठराव; 4 पंचायत सदस्यांचा पुढाकार
मोले : मोले ग्रामपंचायतीचे सरपंच विठोबा मळेकर यांच्याविरोधात 4 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. सरपंचांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता व उत्तरदायित्वाचा अभाव असल्याचा आरोप या सदस्यांनी केला आहे.
ग्रामपंचायतीतील निर्णय घेताना सदस्यांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याचे तसेच निर्णयप्रक्रिया आणि संवादाबाबतही नाराजी असल्याचे अविश्वास ठरावात नमूद करण्यात आले आहे. पंचायत सदस्यांशी योग्य समन्वय राखला जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या अविश्वास ठरावामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. सावर्डेचे आमदार आणि गोवा विधानसभा अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांच्यासाठी हा आणखी एक राजकीय धक्का मानला जात आहे.
आता अविश्वास ठरावावर पुढील प्रक्रिया काय होते आणि सरपंच मळेकर यांच्याविरोधातील ठरावाला किती सदस्यांचा पाठिंबा मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.