वडूज नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव
वडूज :
येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मनिषा काळे यांच्या विरोधात नगरपंचायतीच्या सोळा सदस्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनातील माहितीनुसार, 2022 मध्ये नगरपंचायतीची निवडणूक झाली. त्यामध्ये नऊ महिला व आठ पुरूष सदस्य आहेत. 11 फेब्रुवारी 2022 रोजी नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांची निवड झाली. त्यामध्ये सौ. काळे यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. सौ. काळे या नगराध्यक्ष पदावर आल्यापासून चुकीच्या पध्दतीने वागत आहेत. त्या कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने काम करीत आहेत. त्यांच्या या चुकीच्या वागण्यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे. शहराच्या विकासासंदर्भातही त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. नगराध्यक्षा सौ. काळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करीत असून तो मंजूर होण्याबाबत विशेष सभा बोलविण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर नगरसेविका आरती काळे, सौ. राधिका गोडसे, मनोज कुंभार, शोभा बडेकर, रेखा माळी, रेश्मा बनसोडे, सोमनाथ जाधव, बनाजी पाटोळे, शोभा वायदंडे, ओंकार चव्हाण, अभयकुमार देशमुख, स्वप्नाली गोडसे, सुनिल गोडसे, रोशना गोडसे, जयवंत पाटील, सचिन माळी यांच्या सह्या आहेत.