ठोस आश्वासन नाहीच; विरेश विधानसभेतून पुन्हा पणजीत
पाचव्या दिवशीही बोरकर यांचे आझाद मैदानावर उपोषण कायम
प्रतिनिधी/ पणजी
निगरनियोजन कायद्यातील कलम 39 (अ) पूर्णपणे रद्द करावे, या मागणीसाठी रान उठवलेल्या पाळे-शिरदोण नागरिकांसमवेत लोकचळवळीत सहभागी झालेले आमदार विरेश बोरकर यांनी काल बुधवारी विधानसभा संकुलात ‘कामकाज सल्लागार समिती’च्या बैठकीत उपस्थिती लावली. या बैठकीतही नगरनियोजन कायद्यातील कलम 39 (अ) पूर्णपणे रद्द करावे, यासाठी आग्रह धरीत हे कलम का हटविणे गरजेचे आहे, त्याविषयी मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आमदार विरेश बोरकर यांनी विधानसभेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा पणजीतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली.
ह्या लोकचळवळीत आमदार विरेश बोरकर यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला आमदार बोरकर यांना व्हीलचेअरवरून आले होते. त्यांची प्रकृती अशक्त जाणवत असतानाही त्यांनी या बैठकीत बोरकर यांनी ‘39 (अ)‘ कलमाचा विषय, खासगी ठराव आणि सरकारी कार्यालयात पोलिसांकडून झालेली धक्काबुक्की यावर आक्रमक भूमिका मांडली.
अधिवेशनाची अधिसूचना जारी झाल्यानंतर सभापती आमचे रक्षणकर्ते असतात, मग माझ्यासारख्या आमदाराला धक्काबुक्की कशी होऊ शकते? असा सवाल त्यांनी बैठकीत उपस्थित केला. नगरनियोजन खात्याकडून प्रश्नांची उत्तरे वेळेवर दिली जात नाहीत. असा प्रकार वारंवार घडत असतो, याकडेही त्यांनी बैठकीचे लक्ष वेधले.
मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांना सूचना
आमदार बोरकर यांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्य सचिवांना सूचना देऊन, नगरनियोजन सचिवांकडून तातडीने माहिती पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. सभापतींनीही यापुढे अशा घटना घडणार नाहीत, अशी ग्वाही आमदार बोरकर यांना दिली. परंतु मागणीला ठोस लेखी आश्वासन न मिळाल्याने बोरकर यांनी बैठकीनंतर पुन्हा आझाद मैदानावर जाऊन आपले उपोषण सुरूच ठेवले आहे.
पोलिसांची बदली नव्हे, निलंबनच करा : युरी
अधिवेशनाची अधिसूचना जारी झाल्यानंतरही जर एखाद्या आमदाराला पोलिसांनी ओढून, फरफटत बाहेर काढण्याचा प्रकार म्हणजे लोकशाहीची पायमल्ली करण्यासारखा आहे. त्यामुळे अशा कृत्यांना जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यापेक्षा त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. आमदार विरेश बोरकर यांना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीचा निषेध करत युरी आलेमाव आणि गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सरकारला धारेवर धरले.
चर्चेतून प्रश्न सुटू शकतो : सभापती
सभापती गणेश गावकर यांनी आमदार विरेश बोरकर यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणासंबंधी बोलताना सांगितले की, मी स्वत: आझाद मैदानावर जाऊन विरेश बोरकर यांची भेट घेतली आहे. प्रश्नांची सोडवणूक चर्चेतून अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते, असा सल्ला बोरकर यांना दिला आहे. आपण सभापती या नात्याने आपल्या अधिकारात ज्या-ज्या गोष्टी असतील, त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही सभापती गावकर यांनी सांगितले.