'फार्मर आयडी' नसल्यास सवलती बंद
सांगली :
जिल्हयात शेतकरी आयडी काढण्याला शेतकऱ्यांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तीन लाख शेतकऱ्यांनी शेतकरी आयडी काढलेला असून अद्याप दोन लाख शेतकऱ्यांनी आयडी काढलेला नाही. आता आय डी न काढणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आयडी काढून घ्यावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.
प्रशासनाने आवाहन करूनही दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आयडी काढलेले नाहीत. कृषी विभागाच्या सर्व योजना यापुढे शेतकऱ्यांच्या ओळख क्रमांकाशी निगडीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे पीएम किसान, पिक विमा, महाडीबीटी पोर्टलवरील सर्व योजना, पोक्रा योजना, नैसर्गिक आपत्ती अनुदान, पीक कर्ज यासारख्या सुविधांपासून शेतकरी वंचित राहण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपला आयडी क्रमांक काढून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
- सर्वात जास्त जत, सर्वात कमी खानापूर
शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच शेतकरी आयडी काढण्याची शेवटची तारीख ३१ मार्च होती. या तारखेपर्यंत जिल्ह्यातील सुमारे तीन लाखांवर शेतकऱ्यांनी आपले आयडी क्रमांक काढले आहेत. यामध्ये जत तालुक्याने आघाडी घेत ६५ हजारांवर शेतकऱ्यांचे आयडी काढले आहेत. तर खानापूर तालुक्यात सर्वात कमी आयडी काढण्यात आले आहेत.
- तालुकानिहाय शेतकरी आयडी काढलेल्या खातेदार शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे
तालुका फार्मर आयडी शेतकरी संख्या
आटपाडी २१६२८
जत ६५११९
कडेगाव २७५९६
क. महांकाळ २६८६९
खानापूर २०८६१
मिरज ४१८७१
पलूस २१२३४
शिराळा २७२८७
तासगाव ३६७४६
वाळवा ४५७४८
एकूण ३३४९९५