शहरात व्यापार परवान्याची सक्ती नको
चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेने व्यापार परवान्याच्या सक्तीसाठी मोहीम उघडली आहे. परंतु यामुळे व्यापारी वर्गात तीव्र नाराजी असून, व्यापार परवाना सक्ती करू नये, या मागणीसाठी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मनपा आयुक्त शुभा बी. यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा झाली. व्यापाऱ्यांकडे उद्यम परवाना असतानाही महापालिकेचा व्यापार परवाना घेण्याची सक्ती करण्यात येत आहे. मागील दोन दिवसात शहरातील अनेक व्यापाऱ्यांकडे जाऊन व्यापार परवान्याची तपासणी करण्यात येत आहे. घरपट्टी वसुली व व्यापार परवान्याच्या तपासणीसाठी 21 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यापूर्वीचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या सूचनेनुसार व्यापार परवाना सक्तीचा करू नये, असे तत्कालिन आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी स्पष्ट केले होते. परंतु सध्या मात्र नवीन आयुक्तांमुळे ही मोहीम पुन्हा एकदा आखली आहे.
व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आयुक्तांचे आश्वासन
व्यापाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजने शुक्रवारी मनपा आयुक्तांची भेट घेऊन परवाना सक्ती करू नये, असे आवाहन केले. यापूर्वी व्यापार परवान्यासाठी झालेल्या बैठकीतील निर्णय देखील नूतन आयुक्तांना सांगण्यात आला. यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन व्यापाऱ्यांना सहकार्य करू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजीव कट्टीशेट्टी, उपाध्यक्ष स्वप्नील शहा, संजय पोतदार, मनोज मत्तीकोप, उदय जोशी, हेमेंद्र पोरवाल यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.