बेभान वाहन चालविल्यास भरपाई नाही
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बेभानपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकास अपघात होऊन त्याचा मृत्यू झाल्यास त्याला विमा कंपनीकडून भरपाई मिळू शकणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. पी. एस. नरसिम्हा आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीडाने हा निर्णय गुरुवारी दिला. जे वाहन चालक स्वत:च्या बेभान आणि बेजबाबदारपणे वाहन चालविल्याने स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरतात, त्यांना भरपाई देणे आयोग्य आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने 23 नोव्हेंबर 2024 या दिवशी या प्रकरणात असाच निर्णय दिला होता. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला आहे. हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय असून त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत, असे तज्ञांचे मत आहे. या निर्णयामुळे बेजबाबदारपणे आणि बेभानपणे वाहन चालविणाऱ्याना (रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग) चाप लागणे शक्य आहे.
प्रकरण काय आहे...
18 जून 2014 या दिवशी एन. एस. रविशा नामक वाहन चालकाने मल्लासंद्रा खेड्यापासून अरसीकेरे येथे जात असताना बेभान आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून अपघात केला होता. या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याचे पिता, त्याची बहीण आणि बहिणीची अपत्येही कारमध्ये होती. हा अपघात असरीकेरे शहरानजीक झाला होता. त्याची बहीण आणि पित्याने विमा कंपनीवर हानी भरपाई देण्यासाठी न्यायालयात दावा केला होता. तथापि, त्याचा मृत्यू त्याच्या स्वत:च्या बेकायदेशीर कृत्यामुळे झाल्याने नातेवाईकांना भरपाई मागण्याचा अधिकार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला. उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयानेही आता हाच निर्णय दिल्याने तो नियम बनला आहे. त्यामुळे यापुढे बेभानपणे वाहन चालून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांनाही भरपाई देण्याचे उत्तरदायित्व विमा कंपनीवर राहणार नाही, असा या निर्णयाला अर्थ तज्ञांकडून लावला जात आहे.