भारतीय संघात फेरबदल नको: शास्त्री
वृत्तसंस्था / दुबई
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील येथे मंगळवारी होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या उपांत्य सामन्यासाठी रोहीत शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये फारसा बदल करणे उचित ठरणार नाही. तथापि, रविवारी न्यूझीलंड संघावर विजय मिळविलेला भारतीय संघ उपांत्य सामन्यासाठी कायम ठेवावा, असे मत माजी कर्णधार आणि प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्रीने व्यक्त केले आहे.
रविवारी येथे झालेल्या प्राथमिक फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने कडव्या न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात भारताची फिरकी गोलंदाजी अधिक प्रभावी ठरली. भारतीय संघातील फिरकी गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि नवोदित वरुण चक्रवर्ती यांच्यावर होती. दरम्यान वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी अधिक परिणामकारक ठरली. त्याने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत आपले पदार्पण करताना न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 5 गडी बाद करण्याचा पराक्रम केला.
दुबईच्या खेळपट्टीचा स्वभाव भारतीय गोलंदाजांना बऱ्यापैकी आला असून येथील वातावरणाशी भारतीय खेळाडूंनी बऱ्यापैकी स्वत:ला जमवून घेतल्याचे जाणवते. या स्पर्धेतील भारताचे सर्व सामने दुबईच्याच खेळपट्टीवर खेळविण्यात आले आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताने 249 धावांपर्यंत मजल मारली होती. पण न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारताचे हे आव्हान पेलवले नाही. हा सामना उपांत्य फेरीतील सामन्याप्रमाणे स्पर्धात्मक आणि चुरशीचा झाल्याचे मत शास्त्राrने व्यक्त केले आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना लाहोरच्या गदापी स्टेडियमवर बुधवारी न्यूझीलंड आणि द. आफ्रिका यांच्यात होणार आहे.
मंगळवारच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने न्यूझीलंडबरोबरच्या सामन्यातील संघ कायम राखण्यावर भर देईल. दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाजी आक्रमक आणि बळकट असल्याने भारतीय गोलंदाजीची या सामन्यात खरी सत्वपरिक्षा राहिल. पण दुबईच्या खेळपट्टीवर भारतीय फिरकी गोलंदाज पुन्हा प्रभावी ठरतील, अशी आशा रवी शास्त्रीने वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.