For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयपीएल सामना निकालानंतर सार्वजनिक ठिकाणी जल्लोष नको

07:37 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयपीएल सामना निकालानंतर सार्वजनिक ठिकाणी जल्लोष नको
Advertisement

पोलीस आयुक्तांच्या नागरिकांसाठी सूचना  

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : रविवार दि. 31 मे रोजी होणाऱ्या टाटा आयपीएल-2026 च्या सामन्याच्या निकालानंतर सार्वजनिक ठिकाणी जल्लोष करू नये, अशी सूचना पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत.

Advertisement

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यानंतर सार्वजनिक ठिकाणी कोणीही जल्लोष करू नये, सामना पाहण्यासाठी महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय रस्त्याला लागूनच एलईडी वॉल लावू नये, आतषबाजी करू नये, अशा सूचनाही पोलीस आयुक्तांनी केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी प्रत्येकाने शांतता व शिस्त पाळावी, वाहतूक पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या सल्ला व सूचनांचे पालन करावे, मोटरसायकल रॅली, सुसाट वेगाने दुचाकी चालविणे, स्टंट करणे, कर्कश आवाजाचा हॉर्न वाजवणे व वाहतुकीला अडथळे निर्माण करू नयेत, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून अशांत वातावरण निर्माण करू नये, भांडण करणे किंवा असभ्य वर्तन करू नये, असे आवाहनही एका पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

अंतिम निकालानंतर समाजमाध्यमावर प्रक्षोभक पोस्ट टाकून कोणीही अफवा पसरवू नये, निकालानंतर इतर संघांच्या चाहत्यांना चिथावणी देणे किंवा त्यांच्यावर टीका करणे, त्यांच्याबरोबर भांडण करणे आदी प्रकारही कोणी करू नये, शहर व उपनगरात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे पंधरा अल्कोमीटर असणार आहेत. या माध्यमातून मद्यपींची तपासणी करण्यात येणार असल्याचेही पोलीस आयुक्तांनी पत्रकात म्हटले आहे. स्वत:जवळ शस्त्र बाळगणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी अँटी स्टॅबिंग स्क्वॉड कार्यरत असणार आहे. त्यांच्याजवळ बॉडीवोर्न कॅमेरा असणार आहे. नशेत वाहने चालविणाऱ्यांवर आयएमव्ही कायद्यांतर्गत पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 10 हजार रुपये दंड व सहा महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या चुका पुन्हा करणाऱ्या वाहनचालकांना 15 हजार रुपये दंड व दोन वर्षे शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. त्यांचे लायसन्सही रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे जल्लोषाच्या नावाखाली कोणीही शहराच्या शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.