Hupari Nagar Parishad : हुपरीत एकही अर्ज दाखल नाही
हुपरीत निवडणूक तापली; नागरिक मात्र उत्सुकतेत
हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेत उमेदवारी ऊर्ज दाखल करण्याचा गुरुवारी चौथा दिवस असून एकही अर्ज दाखल झाला नाही. इच्छुकांची नगर परिषदेच्या आवारात मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू आहे. पालिकेत कर विभाग कार्यालयात थकीत वसुली रक्कम भरण्याचे कार्य जोरदारपणे सुरू आहे. चार ते पाच दिवसात ७लाखाहून अधिक कर जमा झाल्याचे समजते.
पालिका निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी आहे. इच्छुकांना विविध प्रकारचे दाखले जमा करण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. अर्जासाठी नगर परिषदेकडून थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालय वापराचा दाखला, मक्तेदार नसल्याबाबतचा दाखला असे दाखले गरजेचे आहेत. त्याकरिता सर्व प्रकारचा कर भरावा लागतो. याचा फायदा कर विभागाला झाला आहे.
गेल्या ५ दिवसात ७ लाख रूपयांहून अधिक कर जमा झाल्याचे समजते. गेली अनेक वर्षे थकीत लाभार्थ्यांना कर भरण्याबाबत नगर परिषद कार्यालयअनेकवेळा नोटिसा देऊन देखील कर भरण्यास टाळाटाळ करणारे स्वतःहून येऊन कर भरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. निवडणुकीचा जमा खर्च दाखवण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी देखील इच्छुकांची पळापळ सुरू आहे. खाते उघडण्यासाठी बँकांनी देखील डिपॉझिटची रक्कम वाढवली आहे.
हुपरी नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर तहसिलदार महेश खिलारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अजय नरळे, अधिकारी प्रशांत तराळ, अश्विनी पाटील, प्रणाम शिंदे, निखिल चव्हाण काम पाहत आहेत.