‘आप’सोबत आघाडी नको : बाजवा
हरियाणात काँग्रेसने करू नये आघाडी
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात आघाडीवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हरियाणात आघाडी करण्यासंबंधीच्या राहुल गांधींच्या ऑफरवर आप नेते संजय सिंह यांनी मंगळवारी प्रतिसाद दिला होता. परंतु बुधवारी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने या संभाव्य आघाडीवरून इशारा दिला आहे.
हरियाणात आम आदमी पक्षासोबत आघाडी केली जाऊ नये. आम आदमी पक्षापासून जितके अंतर राखले जाईल तितकेच काँग्रेससाठी ते चांगले ठरणार असल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रतापसिंह बाजवा यांनी म्हटले आहे.
हरियाणातील आप आणि काँग्रेसच्या आघाडीवरून पुढील काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. आम्ही राज्यात 90 जागांवर निवडणूक लढविणार का 9 जागांवर हे देखील स्पष्ट होणार असल्याचे आप नेते संजय सिंह यांनी नमूद केले आहे. राज्यात आप आणि काँग्रेसदरम्यान आघाडीची शक्यता नाकारता येत नाही. आप आणि काँग्रेस नेतृत्व यासंबंधीची शक्यता पडताळून पाहत आहे. परंतु आघाडीचा निर्णय स्थानिक स्तरावर नव्हे तर पक्षश्रेष्ठीच यासंबंधी निर्णय घेणार असल्याचे आप प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता यांनी म्हटले आहे.
भाजपचे अहंकारी, हुकुमशाही सरकार सत्तेवरून हटविणे हा आपचा उद्देश आहे. राज्य तसेच देशाच्या हिताकरता आघाडी करावी लागल्यास निर्णय घेतला जाणार आहे. हरियाणात भाजपला सत्ता गमवावी लागणार हे निश्चित आहे. आप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष इंडिया आघाडीत सामील आहेत. आम्ही 90 जागांची तयारी करत आहोत असे गुप्ता यांनी म्हटले आहे.