Kolhapur News: NMMS चे बदलले स्वरुप, ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
उद्देश विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील विश्वासार्हता आणि समांतर संधी सुनिश्चित करणे आहे
By : प्रकाश सांडुगडे
पाटगांव : राज्य परीक्षा परीषदेमार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एन.एम.एम.एस.) 21 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावेळी प्रथमच परीक्षेचे स्वरूप बदलून प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका ए, बी, सी, डी संच स्वरूपात वितरीत केली जाणार आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील विश्वासार्हता आणि समांतर संधी सुनिश्चित करणे आहे.
अभ्यासिकेच्या सुधारित नियमांनुसार, विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्यांना कोणताही संच दिला जाणार आहे. प्रत्येक संचामध्ये प्रश्नांचे क्रम वेगवेगळे असतील, मात्र संपूर्ण परीक्षेचा स्तर व विषयवस्तू तंतोतंत सारखी राहील. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता, नक्कल करण्याचा मार्ग रोखण्यात येणार आहे.
परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 11 ऑक्टोंबरपर्यंत नियमित शुल्कासह आणि 12 ते 21 ऑक्टोबर दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. 22 ते 30 ऑक्टोबर दरम्यान अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे भरता येणार असल्याचे परीक्षा परीषदेने जाहीर केले आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी संबंधित योजनेतून वर्षाला 12 हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. परीक्षेसाठी आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाखांपेक्षा कमी असणारे विद्यार्थी अर्जास पात्र ठरतात. शिष्यवृत्तीसाठी निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येते. 21 डिसेंबरला ही परीक्षा होणार आहे.
यात बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी अशा दोन विषयांच्या पेपरचा समावेश असतो. पहिल्या पेपरमध्ये मानसशास्त्रीय चाचणीत कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर तर दुसरा पेपर अभ्यासक्रमावर आधारित असेल.
त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहासचा समावेश आहे. प्रत्येक पेपर 90 गुणांचा असतो. ज्यासाठी पात्रता गुण 40 टक्के मिळणे आवश्यक असते. एस.सी., एस.टी. व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 32 टक्के असा निकष आहे. विद्यार्थ्यांना आठ माध्यमातून ही परीक्षा देता येते.
पूर्वीची पद्धत
पूर्वी एन.एम.एम.एस. परीक्षेमध्ये एकसंध संचाने सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्या जात. एकच संच प्रत्येक परीक्षार्थ्यास दिला जात असे. परंतु, यामुळे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हात बंद करण्यास आणि परीक्षेतील निष्पक्षता राखण्यास समस्या निर्माण होत होत्या.
नवीन प्रणाली : एबीसीडी संच पद्धत
प्रत्येक विद्यार्थ्याला ए.बी.सी.डी. या चार वेगळ्या संचांमधून कोणताही एक संच दिला जाईल. प्रत्येक संचात प्रश्नांची वेगवेगळी रूपरेषा असेल. समान विषय असले तरी प्रश्न क्रम, स्वरूप आणि निवडीतील बदल असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कॉपी करण्याची शक्यता पूर्णत: संपुष्टात येईल. प्रत्येक संचाची चाचणी पूर्वप्रकाशित व प्रमाणित पद्धतीने तयार केली जाईल, जेणेकरून परीक्षेची गुणवत्ता व निष्पक्षता राखली जाईल.