निवती लाईट हाऊस समुद्रात पर्यटकांना घेवून जावू नये
बंदर विभागाचे आदेश
मालवण/प्रतिनिधी
निवती लाईट हाऊस येथील खोल समुद्रात पर्यटकांना घेवून जावू नये असे आदेश बंदर विभागाने दिले आहेत .सध्या मालवण बंदरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असून मालवण बंदर हद्दीतुन वेग-वेगळ्या ठिकाणावरून निवती लाईट हाऊस या ठिकाणी खोल समुद्रात पर्यटकांना घेवून काही बोटी जात असल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आलेले आहे. मान्सूनपुर्व कालावधी जवळ आला असल्या कारणाने समुद्रात कोणत्याही क्षणी वादळ सदृश्य स्थिती निर्माण होवू शकते. तसे झाल्यास खोल समुद्रात गेलेल्या प्रवासी बोटीला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन जिवित व वित्त हानी होवू शकते तथापि वरील बाबींचा विचार करता चालू पर्यटन हंगाम संपेपर्यंत कोणीही निवती लाईट हाऊस जवळ किंवा खोल समुद्रात पर्यटकांना घेवून बोट सफर करू नये. अन्यथा संबंधिंतांविरोधात विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बंदर निरीक्षक, मालवण महाराष्ट्र सागरी मंडळ यांनी केले आहे.