नितीश यांचा नकार, राजकारण तापले
कोण बोलावतेय, राजदची विचारणा : लालूप्रसाद यादव घाबरल्याची भाजपची टिप्पणी
वृत्तसंस्था/ पाटणा
संजदचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या खुल्या ऑफरला नाकारले आहे. चुकून दोनवेळा लालूप्रसाद यांच्यासोबत गेलो होतो, आता त्यांच्यासोबत पुन्हा जाणार नाही असे नितीश यांनी रविवारी मुजफ्फरपूर येथे प्रगती यात्रेदरम्यान म्हटले आहे. तर लालूप्रसादांच्या ऑफरवर नितीश यांचा नकार आता बिहारमधील राजकारणाचा पारा वाढविणारा ठरला आहे. नितीश यांना बोलावतेय कोण असे राजदने म्हटले आहे. तर लालूप्र्रसाद यादव घाबरले असल्यानेच ते अशाप्रकारची ऑफर देत असल्याचे भाजप अन् संजदचे नमूद केले. नितीश कुमार जेव्हा नकार देतात, तेव्हा त्याचा अर्थ ‘नाही’ असा निश्चितपणे नसतो असा दावा काँग्रेसने केला आहे.
नितीश कुमार यांनी रविवारी मुजफ्फरपूर येथे सुमारे 450 कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ केला आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही चुकून राजद अन् काँग्रेससोबत गेलो होतो. आता जुन्या सहकाऱ्यासोबत आहे. राजदसोबत आता कधीच जाणार नाही. लालूप्रसाद आणि राबडीदेवींचे सरकार असताना महिलांसाठी काहीच करण्यात आले नव्हते. त्यांच्या शासनकाळात संध्याकाळी घरातून कुणी बाहेर पडू शकत नव्हते. विकासाची सर्व कामे आम्ही सत्तेवर आल्यावर झाली आहेत, असा दावा नितीश कुमार यांनी केला आहे.
नितीश कुमार जेव्हा पूर्णविराम देतात, तेव्हा ते निश्चितच निर्णय घेणार असल्याचे समजले जावे. नितीश यांच्या नकाराचा अर्थ नाही असा नसतो. इंडी आघाडीत असताना नितीश हे मातीमोल ठरेन पण भाजपसोबत जाणार नाही, असे म्हणायचे अशी आठवण काँग्रेस प्रवक्ते राजेश कुमार यांनी करून दिली.
तर राजद प्रवक्ते एज्या यादव यांनी नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर तीव्र टिप्पणी केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजद त्यांना स्वीकारण्यास तयार असल्याच्या भ्रमात राहू नये. नितीश कुमार हे स्वत:च्या राजकीय समारोपाच्या यात्रेवर आहेत. बिहारला एक युवा सरकार हवे असून ते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातच शक्य असल्याचा दावा राजद प्रवक्त्याने केला आहे.
लालूप्रसाद यांना पराभवाची जाणीव असल्यानेच ते अशाप्रकारची ऑफर देत आहेत. लालूप्रसाद यांना कुठल्याही स्थितीत स्वत:च्या पुत्राला सत्तेवर आणायचे आहे. परंतु कोण सत्ता चालविणार हे बिहारची जनता ठरविते. नितीश कुमार हेच राज्याचे नेतृत्व करतील असे राज्याचे उपमुख्यमंत्री अन् भाजप नेते सम्राट चौधरी यांनी म्हटले आहे.
भाजप, संजदकडून राजद लक्ष्य
2025 च्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वातखाली रालोआ पूर्ण बहुमतासह विजयी होणार आहे. याचमुळे लालूप्रसाद यादव घाबरले आहेत. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार यात कुठलाही संशय नाही, असे वक्तव्य संजदचे प्रवक्ते अरविंद निषाद यांनी केले आहे.नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहार विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा विकास राजदच्या पचनी पडत नसल्याने तो पक्ष राज्याला अस्थिरतेच्या दिशेने नेण्याचा कट रचत आहे. परंतु राजदचा हा कुटिल हेतू कधीच पूर्ण होणार नाही, कारण नितीश कुमार हे रालोआतच राहणार आहेत, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष संतोष पाठक यांनी म्हटले आहे.