नितीशकुमारांची आज अग्निपरीक्षा! बिहार विधानसभेत होणार बहुमत चाचणी
: मुख्यमंत्रिपद टिकविण्यासाठी जोरदार धडपड
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील नितीशकुमार सरकारची सोमवार, 12 फेब्रुवारी रोजी बिहारमध्ये फ्लोर टेस्ट (बहुमत चाचणी) होत आहे. या अग्निपरीक्षेपूर्वी राज्यात राजकीय पेच वाढला आहे. भाजप, आरजेडी, जेडीयू, काँग्रेस, डावे आणि हम पक्षांनी आपापल्या आमदारांना पक्षाशी बांधील ठेवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. याचदरम्यान, गया येथील हॉटेलमध्ये दोन दिवस थांबलेले भाजपचे आमदार तीन बसमधून पाटण्याला रवाना झाले आहेत.
बिहार आणि नितीशकुमार यांच्या सरकारसाठी सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 चा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी युती सरकारची फ्लोअर टेस्ट होणार आहे. नितीश कुमार यांच्या सरकारला बहुमत मिळाले नाही, तर पुन्हा एकदा राजकीय पेच निर्माण होणार हे निश्चित आहे. नितीश कुमार यांचे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकेल, असे आकडे सांगत असले तरी राजद नेत्यांच्या वक्तव्यावरून ‘खेला’ होण्याची शक्यता गृहीत धरून भाजप आणि जेडीएसने अत्यंत सावध पवित्रा घेतलेला दिसत आहे.
बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आमदारांच्या संख्येपेक्षा जास्त पाठिंबा असल्याचा नितीश कुमार यांचा दावा आहे. पण बहुमत चाचणीवेळी ‘खेला’ करण्याचा इशारा विरोधकांनी केल्यामुळे येथील अग्निपरीक्षेकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. युती सरकारच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव घेण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. या परीक्षेपूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या छावणीत राजकीय घडामोडींना उधाण आले आहे.
सर्वच राजकीय पक्षांमध्ये विविध प्रकारच्या हालचाली पाहायला मिळत आहेत. एकीकडे भाजपने आपल्या आमदारांना गयामध्ये नेले होते. दुसरीकडे, जेडीयूने आपल्या आमदारांसाठीही विशेष भोजनावळीचे नियोजन केले होते. याचदरम्यान माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आपल्या आमदारांना एकत्र करत बरीच गुफ्तगू चालवल्याचीही चर्चा आहे. तर विरोधी महाआघाडीत 19 सदस्य असलेले काँग्रेसचे आमदार हायकमांडच्या सूचनेनुसार सध्या हैदराबादमध्ये आहेत. एकंदर सर्वच राजकीय पक्ष आपला गड अभेद्य करण्यात व्यस्त आहेत.
तेजस्वी यादव यांच्याकडून जमवाजमव
पक्षात संभाव्य फूट पडण्याची भीती लक्षात घेऊन राष्ट्रीय जनता दलाने सोमवारी होणाऱ्या फ्लोअर टेस्टपर्यंत आमदारांना तेजस्वी प्रसाद यादव यांच्या अधिकृत निवासस्थानी ठेवले आहे. आमदारांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी त्यांना सर्वप्रथम निमंत्रित करण्यात आले होते. आमदारांच्या सभेला ते उपस्थित राहण्यासाठी आले असता त्यांना कपड्यांपासून ते औषधोपचार आणि इतर वस्तू घेण्यास सांगण्यात आले. या कंपूमध्ये मोकामाच्या आमदार नीलम देवी वगळता सर्व 78 आमदार उपस्थित असल्याचे समजते. तसेच त्यांच्यासोबत डाव्या पक्षांचे 16 आमदारही उपस्थित होते.
विधानसभेतील बहुमताचा आकडा 122
बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा 122 आहे. नितीशकुमार यांनी 128 आमदारांचे समर्थन पत्र राज्यपालांना सादर केले होते. तर महाआघाडीकडे 115 आमदार आहेत. एकीकडे युतीकडे बहुमतापेक्षा फक्त 6 आमदार जास्त आहेत, तर महाआघाडीकडे बहुमतापेक्षा फक्त 7 आमदार कमी आहेत. या सहा ते सात आमदारांसाठी बराच ‘खेला’ सुरू आहे.
जीतनराम मांझी यांच्या पक्षाकडून व्हीप जारी
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा पक्ष ‘हिंदुस्थानी अवाम मोर्चा’ने व्हीप जारी केला आहे. पक्षाने आमदारांना व्हीप जारी करून सरकारच्या बाजूने मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मांझी यांच्या पक्षाकडे एकूण चार आमदार आहेत. ‘12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या बिहार विधानसभेच्या सर्व बैठकांना सुऊवातीपासून शेवटपर्यंत उपस्थित राहावे आणि वादविवाद, आर्थिक काम, विधिमंडळ कामकाज आणि इतर सरकारी कामांमध्ये मतदानात सहभागी व्हावे’, असे पक्षाने व्हीपमध्ये म्हटले आहे. सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी हिंदुस्थानी अवाम मोर्चाने आपल्या सर्व सदस्यांना व्हीप जारी करतानाच एक पत्रकही पाठवले आहे. या पत्राच्या शेवटी पक्षप्रमुख जीतन राम मांझी यांची स्वाक्षरी आहे.