बिहारमध्ये ‘नितीश-मोदी’ जोडी हिट
बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआने 200 हून जागा जिंकत महाआघाडीचा दारुण पराभव केला आहे. रालोआच्या वतीने भाजपने 92, संजदने 83, लोजपने 19 आणि हमने 5 जागा जिंकल्या आहेत. तर महाआघाडीच्या गोटात राजद 27, काँग्रेस 5, डाव्या पक्षांनी 2 जागा पटकाविल्या आहेत. बिहारचा निकाल पाहता राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जोडी हिट ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. तर तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्या जोडीला जनतेने सपशेल नाकारले आहे.
नितीश-मोदींच्या जोडीवर भरवसा
बिहार निवडणूक निकालातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर बिहारच्या जनतेचा भरवसा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. 20 वर्षे सरकार चालविल्यावरही नितीश कुमार यांच्याबद्दल राज्याच्या जनतेत कुठलीच नाराजी नसल्याचे ठळकपणे समोर आले आहे. याचमुळे केवळ नितीश कुमार यांचा पक्ष नव्हे तर रालोआतील सर्व पक्षांनीच मोठे यश मिळविले आहे.
तेजस्वी यांचा चेहरा नाकारला
बिहारच्या बहुतांश मतदारांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्याचा निष्कर्ष निकालातून काढला जाऊ शकतो. महाआघाडीने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली होती. महाआघाडीच्या प्रचारात केवळ तेजस्वीच दिसून येत होते. अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रोजेक्शन होऊनही महाआघाडी पराभूत झाल्याने बिहारच्या जनतेला तेजस्वी यांचा चेहरा नेता म्हणून पसंत नसल्याचे संकेत मिळाले आहेत.
राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दा ठरला फुस्स
बिहार निकालामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वोट चोरीचा मुद्दा पूर्णपणे फुस्स ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधींनी वोट चोरीच्या मुद्द्यावरून पूर्ण बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा काढली होती. या यात्रेत तेजस्वी यादव, दीपांकर भट्टाचार्य, मुकेश सहनी समवेत महाआघाडीच्या सर्व नेत्यांनी एकजुटता दाखविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काँग्रेस राज्यात केवळ 4 जागा जिंकता आल्या आहेत.
जनसुराजला बिहारने पूर्णपणे नाकारले
प्रशांत किशोर यांच्या जनसुराजला बिहारच्या जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. प्रशांत किशोर हे प्रचंड बहुमत मिळण्याचा दावा करत होते, परंतु त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. सोशल मीडियावर मोठमोठे दावे करणारा जनसुराज फुसका बार ठरला आहे.
महिला अन् ईबीसीचा रालोआवरील भरवसा कायम
बिहारमधील महिलांनी मोठ्या प्रमाणात रालोआला मतदान केल्याचे निकालातून स्पष्ट होते. तसेच राज्यातील ईबीसी वर्गाने पूर्वीप्रमाणे नितीश कुमारांच्या नेतृत्वावरच विश्वास दाखविला आहे. ईबीसीचे राज्यातील प्रमाण 36 टक्के असल्याने या समुदायाचा पाठिंबा रालोआसाठी महत्त्वाचा ठरला आहे.
नितीश फॅक्टर : सुशासन, निष्कलंक प्रतिमा
बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. रालोआने बिहारमध्ये निर्णायक विजय मिळविला आहे. महिला मतदारांची पसंती राहिलेले नितीश कुमार हे पुन्हा एकदा स्वत:च्या पारंपरिक मतदारांच्या जोरावर सत्तेवर येणार आहेत. त्यांची निष्कलंक अन् सुशासन बाबूची प्रतिमा महाआघाडीच्या मुद्द्यांवर भारी पडली आहे. नितीश यांच्या या विजयाचे अनेक पैलू आहेत.
महिलांनी राखला नितीश यांचा मान
मुख्यमंत्री नितीश कुमारांनी निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये महिलांसाठी रोजगार योजनेची घोषणा केली होती. याच्या अंतर्गत सरकारकडून 1.5 कोटीहून अधिक महिलांना 10 हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आला. यापूर्वी देखील नितीश यांनी महिला मतदारांना स्वत:च्या बाजूने वळविण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत.
जंगलराजवर भारी ठरले सुशासन
पूर्ण प्रचारादरम्यान रालोआने लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळातील ‘जंगलराज’चा मुद्दा उपस्थित केला. याचा परिणाम निवडणूक निकालावरही दिसुन आला आहे. नितीश कुमार हे प्रचारसभेत लालूप्रसादांच्या कार्यकाळातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत राहिले. तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी स्वत:च्या सभांमध्ये नितीश कुमारांच्या सुशासनाचे जोरदार कौतुक केले होते. नितीश यांची प्रामाणिक प्रतिमा देखील मतदारांवर प्रभाव पाडणारी ठरली.
वैयक्तिक प्रतिमा
20 वर्षांच्या शासनानंतरही नितीश यांच्यावरील बिहारच्या मतदारांचा भरवसा कायम आहे. इतक्या दीर्घ कार्यकाळानंतरही नितीश यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. तर राजकीय पक्षांवर होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपांपासूनही नितीश कुमार दूर राहिले आहेत. याचबरोबर दारूबंदी, महिलांसाठी रोजगार योजना यासारख्या कार्यक्रमांनी त्यांच्या प्रतिमेला आणखी मजबूत केले आहे.