For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नितीश कुमारांचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हाती - राहुल गांधी

06:02 AM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
नितीश कुमारांचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हाती   राहुल गांधी
Advertisement

बिहारमध्ये सभा : नितीश यांच्या चेहऱ्याचा भाजपकडून वापर

Advertisement

वृत्तसंस्था/ सकरा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी बिहारमध्ये महाआघाडीकरता प्रचारसभा घेत भाजपला लक्ष्य केले. भाजपकडून नितीश कुमारांच्या चेहऱ्याचा वापर होत आहे. तर प्रत्यक्षात नितीश यांचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हातात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सामाजिक न्यायाच्या विरोधात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी मुजफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा येथील सभेत बोलताना केला आहे.

Advertisement

राहुल यांच्या या सभेत राजद नेते तेजस्वी यादव आणि अन्य घटक पक्षांचे नेतेही सामील झाले. बिहारमध्ये 20 वर्षांपासून नितीश कुमारांचे सरकार आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी त्यांनी काय केले? लोकांना काहीही मिळत नसलेले आणि अदानींना एक-दोन रुपयांत मोठा भूखंड देण्यात येणारे राज्य तुम्ही इच्छिता का असा प्रश्न राहुल गांधींनी सभेला उपस्थित समुदायाला विचारला.

शिक्षण, आरोग्य आणि रोजगार असेल आणि बिहारींना स्वत:चे भविष्य दिसेल असा बिहार आम्ही इच्छितो. बिहारमधील लोकांनी रोजगारासाठी अन्य राज्यांमध्ये पलायन करावे लागू नये. तर अन्य राज्यांमधील लोकांनी येथे येत काम करावे अशी आमची इच्छा आहे. महाआघाडी बिहारला विकासात आघाडीवर नेऊ इच्छिते. बिहारचे लोक कुठल्याही बाबतीत कुणापेक्षा कमी नाहीत. हे राज्य सर्वांच्या पुढे जाऊ शकते आणि जाणार असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

एकीकडे यमुना नदीत अस्वच्छ पाणी होते, तर बाजूला स्वच्छ पाण्याचा तलाव तयार करण्यात आला होता, जेणेकरून पंतप्रधान त्यात स्नान ‘ड्रामा’ करू शकतील, त्यांना छठ पूजेशी कुठलेच देणेघेणे नाही असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी दिल्ली यमुनाकाठावर छठ पूजा आयोजनाचा उल्लेख करत  केला. पंतप्रधान मतांसाठी काहीही करू शकतात, लोकांनी मतांसाठी नाचा असे सांगितले तर ते नाचून दाखवतील अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.