For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इंडिया’ आघाडीत नितीश कुमारांवरून हालचालींना वेग

06:43 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘इंडिया’ आघाडीत नितीश कुमारांवरून हालचालींना वेग
Advertisement

राहुल गांधींनी फोनवरून साधला संपर्क : तेजस्वी यादवांनी घेतली भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

‘इंडिया’ आघाडीच्या चौथ्या बैठकीनंतर संजद नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संजदचे नेते एकीकडे नाराजीचा दावा फेटाळत आहेत. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करून नितीश कुमारांना झटका दिला असल्याचे बोलले जात आहे. या कथित नाराजीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नितीश कुमारांशी फोनवरून संपर्क साधत बैठकीत झालेल्या निर्णयासंबंधी चर्चा केली आहे. तर सूत्रांनुसार राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी तातडीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली आहे.

Advertisement

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांच्या भूमिकेत बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्याशी सुमारे अर्ध्या तासापर्यंत चर्चा केली आहे. प्रत्यक्षात तेजस्वी यादव आणि लालूप्रसाद यांना शुक्रवारी दिल्लीत ईडीसमोर हजर रहावे लागणार होते, परंतु नितीश यांच्याबद्दल राजकीय गोंधळ निर्माण झाल्याने दोन्ही नेते पाटण्यातच ठाण मांडून आहेत. डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आता काँग्रेस आणि राजदकडुन केला जात आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी खर्गे यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचा प्रस्ताव मांडल्यावर नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव हे नाराज झाले होते. दोन्ही नेते बैठक संपण्यापूर्वीच निघून गेले होते. तसेच पत्रकार परिषदेतही सामील झाले नव्हते. पंतप्रधानपदासाठी खर्गे यांच्या नावाच्या प्रस्तावाची नितीश कुमारांना कल्पना नव्हती.

ललन सिंहांवर नाराज?

इंडिया आघाडीच्या बैठकीत भाग घेत नितीश कुमार हे दिल्लीवरून परतल्यावर संजदने राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची एकत्रित बैठक बोलाविण्याची घोषणा केली आहे. या बैठकीत नितीश कुमार हे संजद अध्यक्ष म्हणून ललन सिंह यांना हटवून स्वत: पक्षाची धुरा हाती घेऊ शकतात असे मानले जात आहे. या निर्णयाची घोषणा 29 डिसेंबर रोजी पक्षाच्या बैठकीत केली जाऊ शकते.

ललन सिंहांची राजदशी जवळीक

ललन सिंह यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे नितीश कुमार नाराज असल्याचे सांगण्यात येतेय. याचबरोबर ललन सिंह यांचे राजदसोबतचे घनिष्ठ संबंध पाहता नितीश कुमार हे निर्णय घेऊ शकतात. पक्षातील अनेक नेत्यांसोबत ललन सिंह यांचे मतभेद असून यात गृहनिर्माणमंत्री अशोक चौधरी यांचा समावेश आहे. पक्षातील स्थिती पाहता नितीश कुमार हे पक्षप्रमुख पद स्वत:कडे घेऊ शकतात. लोकसभा निवडणुकीपर्यंत ते पक्षप्रमुख म्हणून भूमिका बजावू शकतात. परंतु अशोक चौधरी, राज्याचे अर्थमंत्री विजय कुमार चौधरी आणि जलसंपदा मंत्री संजय झा यासारखे अन्य नेते देखील पक्षप्रमुख पदासाठी संभाव्य दावेदार असू शकतात.

Advertisement
Tags :

.