For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नितीशकुमारांनी सोडली विधानपरिषद

06:29 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
नितीशकुमारांनी सोडली विधानपरिषद
Advertisement

आता राज्यसभा सदस्य म्हणूनच कार्यरत राहणार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली, पाटणा

दहावेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे. बिहारमधून त्यांची काही दिवसांपूर्वी राज्यसभेवर निवड झाली आहे. यापुढे ते राज्यसभा सदस्य म्हणूनच कार्यरत राहणार आहेत. संयुक्त जनता दलाचे विधान परिषद सदस्य संजय गांधी यांनी त्यांचे त्यागपत्र विधान परिषद अध्यक्ष अवधेश नारायण सिंग यांच्याकडे सुपूर्द केले. नितीशकुमार हे 10 एप्रिल या दिवशी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

16 मार्च या दिवशी नितीशकुमार यांची निवड राज्यसभेवर झाली आहे. त्यानंतर 14 दिवसांमध्ये त्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र देण्याची, नियमानुसार आवश्यकता होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी 30 मार्च या दिवशी विधान परिषद सदस्यत्वाचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांना आता बिहारचे मुख्यमंत्रीपदही सोडावे लागणार आहे. बिहारमध्ये आता मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची संधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

सहा महिन्यांचा अवधी

विधान परिषद सदस्यत्व नितीश कुमार यांनी सोडले असले, तरी ते आणखी सहा महिने बिहारच्या मुख्यमंत्रीपदी राहू शकतात, असे मत बिहारचे मंत्री शर्वणकुमार सिंग यांनी व्यक्त केले होते. तथापि, तेव्हढा काळ नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी राहू इच्छितात काय, हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर येत्या काही दिवसांमध्ये मिळेल, अशी स्थिती आहे. सध्या बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांसंबंधी चर्चा केली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि बिहारचे विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी निवड होईल, असे बोलले जाते.

वारसदाराची निश्चिती नाही

अद्याप नितीशकुमार यांचे स्थान कोण घेणार, या विषयी स्पष्टता आलेली नाही. भारतीय जनता पक्षाच्या हे पद मिळणार, दोन्ही पक्षांनी ठरविलेले आहे, असे प्रतिपादन केले जाते. तथापि, अद्याप नावाची निश्चिती झालेली नाही. परिणामी, मुख्यमंत्रीपदासंबंधी निर्णय होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडले, तरी ते बिहारच्या राज्यसरकारला मार्गदर्शन करतील आणि पाटण्यामध्येच वास्तव्यास असतील, अशी शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.