For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नितीश कुमार नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री

06:57 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
नितीश कुमार नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री
Advertisement

बिहारमध्ये पुन्हा ‘भाजप-जेडीयु’चे पर्व सुरू, 2 उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 9 जण शपथबद्ध

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

नितीश कुमार यांनी रविवारी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच चालू कार्यकाळात त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर करत आपणच नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. पाटणा येथील राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात नितीश कुमार यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांनीही पदाची शपथ घेतली. सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांना राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. तसेच प्राथमिक टप्प्यात एकंदर 9 जणांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाले असून जेडीयू प्रमुखच मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले आहेत. ‘इंडिया’ आघाडीला चकवा देत नितीश कुमार यांनी रविवारी संध्याकाळी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. नितीश कुमार यांच्या शपथविधीसोबतच 17 महिन्यांच्या महाआघाडीचे सरकारही संपुष्टात आले असून नितीश कुमार पुन्हा भाजपसोबतच्या जुन्या छावणीत परतले आहेत. शपथविधीप्रसंगी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देण्यात आल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी न•ाही शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी राजभवनात पोहोचले होते. तसेच चिराग पासवान, जीतन राम मांझी आणि विनोद तावडे यांच्यासह अनेक बडे नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजपाध्यक्ष न•ा यांनी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली.

दुपारी राजीनामा, संध्याकाळी पुन्हा मुख्यमंत्री, 128 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र

नितीशकुमार यांनी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर काही वेळातच 128 आमदारांचे समर्थन पत्र घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. नितीश यांना भाजपचे 78 आमदार, 45 जेडीयू, चार हिंदुस्थान अवाम मोर्चा (हम) आणि एका अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. राजीनाम्यानंतर पाच तासांनी नितीशकुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितीश कुमार यांनी आरजेडीवर हल्लाबोल करताना महाआघाडीत चांगले काम करताना अडथळे येत असल्यामुळेच आता पूर्वीची ‘आघाडी’ सोडून नवी ‘युती’ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जातनिहाय संतुलन साधण्याचा प्रयत्न

नितीश कुमार यांनी आपल्या नव्या सरकारमध्ये जातीय समीकरणाची चांगलीच काळजी घेतली आहे. त्यांच्या नव्या सरकारमध्ये कुर्मी समाजातून 2, भूमिहार समाजातून 2, राजपूत समाजातून 1, यादव, मागास, अतिमागास आणि महादलित समाजातून प्रत्येकी 1 असे एकूण 9 जणांना मंत्री करण्यात आले आहे. लखीसराय मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले विजय सिन्हा हे भूमिहार जातीचे आहेत. त्यांनी बिहारचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मागील सरकारमध्ये ते कामगार संसाधन मंत्री होते. भाजप नेते सम्राट चौधरी यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते कुशवाह जातीचे असून बिहार भाजपचे अध्यक्ष आहेत. दिग्गज नेते शकुनी चौधरी यांचे ते पुत्र आहेत. याशिवाय जेडीयूचे बिजेंद्र प्रसाद यादव यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच भाजपचे डॉ. प्रेम कुमार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. जेडीयूचे श्र्रवण कुमार यांनी नव्या सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्मयुलर)चे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार सुमन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अपक्ष आमदार सुमित कुमार सिंह यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

तेजस्वी यादवांची जेडीयुवर आगपाखड

राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीवर आरजेडी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी संताप व्यक्त केला. ‘बिहारमध्ये सुरू झालेला हा खेळ नुकताच सुरू झाला आहे, अजून खेळ बाकी आहे... असे सांगतानाच जेडीयू पक्ष 2024 मध्येच संपेल...’ असा दावा त्यांनी केला. नितीश कुमार यांचा यापूर्वीही आदर केला जात होता. आजही आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच उपमुख्यमंत्री असताना आरजेडीच्या मंत्र्यांनी खूप चांगले काम केल्याचेही त्यांनी सांगितले.

विश्वासदर्शक ठरावाची काँग्रेसची मागणी

बिहारमधील बदलत्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर पूर्णिया येथे काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत 18 आमदार उपस्थित होते. एक आमदार प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकला नसल्याचे पर्यवेक्षक भूपेश बघेल यांनी सांगितले. तरीही सर्व आमदार एकत्र असल्याचा दावा त्यांनी केला. याचदरम्यान नवे सरकार आल्यानंतर काँग्रेसने लवकरात लवकर विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली आहे. जेडीयूचे अनेक आमदार नाराज असून फ्लोअर टेस्टमध्ये सर्व काही स्पष्ट होईल. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून पाहून बिहारच्या जनतेचा अपमान झाला आहे, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले.

Advertisement
Tags :

.