For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारमध्ये नितीश कुमार यांना मिळाली संजीवनी

06:50 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिहारमध्ये नितीश कुमार यांना मिळाली संजीवनी
Advertisement

बिहारमध्ये रालोआने 30 जागांवर यश मिळविले असून यात संजद 12, भाजप 12, लोजप (रामविलास) 5 आणि हम या पक्षाने एका जागेवर विजय मिळविला आहे. इंडियाचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत. राजद 4, भाकप माले 2 तर काँग्रेसला 3 मतदारसंघांमध्ये विजय मिळाला आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांना प्रचारात मिळालेला प्रतिसाद पाहता इंडिया आघाडीला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे मानण्यात येत आहे. तर रालोआत चिराग पासवान यांच्या पक्षाने स्वत:च्या वाट्याला आलेल्या सर्व जागा जिंकल्या आहेत.

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजद अध्यक्ष तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत. तर संजदने नितीश कुमार हे रालोआतच राहतील, असे स्पष्ट केले आहे. नितीश कुमार हे बुधवारी होणाऱ्या रालोआच्या बैठकीत सामील होतात की नाही यावरून पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री आर.के. सिंह हे आरा या मतदारसंघात भाकप मालेचे उमेदवार सुदामा प्रसाद यांच्याकडून पराभूत झाले आहेत. तर बेगूसराय मतदारसंघात केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हे विजयी झाले आहेत. तर उजियारपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी यश मिळविले आहे. काराकाटमध्ये अपक्ष उमेदवार पवन सिंह यांनी रालोआ उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्या विजयात अडथळे निर्माण केले. येथील त्रिकोणी लढतीत भाकप मालेचा उमेदवार विजयी ठरला आहे.

Advertisement

अपक्ष पप्पू यादवांची सरशी

पूर्णिया मतदारसंघात बाहुबली नेते पप्पू यादव हे विजयी झाले आहेत. तर सिवान मतदारसंघात दिवंगत बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीनची पत्नी हिना शहाबला पराभवाची चव चाखावी लागली आहे. लालूप्रसाद यादव यांची एक कन्या रोहिणी आचार्य ही सारन मतदारसंघात भाजप उमेदवार राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभूत झाली आहे. तर लालूंची दुसरी कन्या मीसा भारती ही पाटलिपुत्र मतदारसंघात विजयी झाली आहे. या मतदारसंघात तिने स्वत:चे काका रामकृपाल यादव यांच्यावर मात केली आहे.

रविशंकर प्रसाद विजयी

पाटणासाहिब मतदारसंघात अपेक्षेनुसार भाजपचे उमेदवार रविशंकर प्रसाद हे विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार अंशुल अभिजीत यांना येथे पराभव पत्करावा लागला आहे. अंशुल हे काँग्रेसच्या दिग्गज नेत्या मीरा कुमार यांचे पुत्र आहेत. गया मतदारसंघात माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळविला आहे. त्यांनी राजदचे कुमार सर्वजीत यांना पराभूत केले आहे. समस्तीपूरमध्ये लोजपच्या उमेदवार शांभवी चौधरी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत केले.

.प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा डंका

पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 29 जागांवर तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) बाजी मारत भाजपला धक्का दिला. भाजपने 12 जागांवर आघाडी मिळवली. मालदा दक्षिण या केवळ एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार ईशा खान चौधरी यांनी ‘रस्सीखेच’मध्ये सुसंधी साधली. सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या मतमोजणीपर्यंत बंगालमधील लोकसभेच्या सहा जागांवर मतांचा फरक 5,000 पेक्षा कमी होता. अशा परिस्थितीत भाजप आणि टीएमसी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू होती.

पश्चिम बंगालमधील एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात यंदा भाजप आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करेल असा दावा केला जात होता, परंतु मतमोजणीअंती सुऊवातीपासूनच भाजप मागे पडल्याचे दिसून आले. जसजशी मतमोजणी पुढे सरकत गेली तसतशी भाजपची आघाडी कमी होत गेली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या. मात्र, ह्यावेळी त्यात घट झाली. पक्षाच्या जवळपास 6 जागा कमी झाल्या. भाजपने गेल्या वेळी जिंकलेल्या अनेक जागा गमावल्या असल्या तरी काही नवीन जागा संपादन केल्या आहेत.

राज्यात तृणमूल काँग्रेसच्या जागा वाढत असल्याचे पाहून अभिषेक बॅनर्जी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ममता बॅनर्जींच्या घरी पोहोचले. येथील कल स्पष्ट होऊ लागताच विजयी मिरवणूक काढण्याची तयारी सुरू झाली होती. तृणमूल काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या तालावर नाचून आणि एकमेकांना ‘हिरवा’ गुलाल लावून आनंदोत्सव साजरा करण्यास सुऊवात केली. तृणमूल काँग्रेसने मंगळवारी मतमोजणीअंती आनंद व्यक्त करत राज्यातील पक्षाची कामगिरी ही ममता बॅनर्जी सरकारच्या ‘लोकस्नेही धोरणां’वरील लोकांचा विश्वास आणि भाजपच्या विरोधात निर्णायक जनादेश दर्शवितात’ असे स्पष्ट केले.

कूचबिहार जागेवर टीएमसीचे उमेदवार जगदीश चंद्र वर्मा आघाडीवर होते. त्यांनी एकूण 7,88,375 मते मिळवत भाजपच्या निशिथ परमाणिक यांचा पराभव केला. रायगंजमधून टीएमसीच्या कल्याणी कृष्णा अवघ्या सुरुवातीपासून आघाडीवर होते. मात्र भाजपचे कार्तिक चंद्र पॉल यांनी साडेपाच लाखांहून अधिक जागा मिळवत कृष्णा यांचा 68,197 मतांनी पराभव केला. कांठी लोकसभा मतदारसंघात टीएमसीचे उमेदवार उत्तम बारीक हे सुरुवातीला आघाडीवर होते. मात्र, भाजपचे उमेदवार सौमेंदू अधिकारी यांनी त्यांना मागे टाकत 47,764 मतांनी विजय मिळवला. विष्णुपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सौमित्र खान हे सुजाता मंडल यांच्यापेक्षा पुढे होते.

बालूरघाट जागेवर भाजपचे उमेदवार सुकांता मजुमदार आघाडीवर राहिले. पुऊलिया मतदारसंघातही तीच स्थिती आहे. येथे भाजपचे उमेदवार ज्योतिर्मय सिंह महतो पुढे होते. मालदा दक्षिण लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार ईशा खान चौधरी यांनी 1,28,368 इतक्या मोठ्या मताधिक्याने भाजपच्या श्रीपुरा चौधरी यांचा पराभव केला. पश्चिम बंगालमधील या एकमेव जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी झाला आहे.

राज्यातील एक्झिट पोल अंदाज फेल...

बंगालच्या सर्वाधिक फॉलो केलेल्या एबीपी-सीव्होटरसह नामांकित एजन्सींनी केलेल्या पाच एक्झिट पोलच्या एकत्रित निष्कर्षांनी भाजपला किमान 21 आणि कमाल 27 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. तर तृणमूल काँग्रेसला किमान 13 आणि जास्तीत जास्त 21 जागा मिळतील, असे भाकित वर्तवण्यात आले होते. मात्र, अंतिम निकालात सर्व माध्यमांचे अंदाज फेल झाल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement
Tags :

.