वादग्रस्त वक्तव्याबाबत नितीशकुमारांची माफी
भाजपकडून राजीनाम्याची मागणी : न्यायालयातही तक्रार दाखल, 25 रोजी सुनावणी
वृत्तसंस्था/ पाटणा
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुलींचे शिक्षण आणि प्रजनन दराबाबत विधानसभा आणि विधानपरिषदेत दिलेल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याची मला लाज वाटत असल्याचे त्यांनी दोन्ही सभागृहात सांगितले. मी माझे विधान मागे घेत आहे. पण, एवढे करूनही त्यांच्याविरोधात ‘आवाज’ उठवला जात आहे. एका तक्रारदाराने त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली असून भाजपकडून राजीनाम्याची मागणी होत आहे.
नितीशकुमार यांच्याविरोधात सर्वप्रथम महिला आयोगाने बिहार विधानसभा अध्यक्षांना कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले. आता त्यांच्याविरोधात मुझफ्फरपूरमध्ये वकील अनिल कुमार सिंह यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तक्रारदाराने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आयपीसी 354 (डी), 504, 505, 509 आणि 67 आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
बिहार विधानसभा आणि विधान परिषदेत मंगळवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शिक्षणाची भूमिका आणि लोकसंख्या नियंत्रणात महिलांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी वापरलेली भाषा अत्यंत अपमानास्पद होती, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे असंख्य आया-बहिणींचा अपमान झाला आहे. संवैधानिक संस्थेत अशी भाषा वापरणे आक्षेपार्ह आहे. न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली आहे. याबाबतची पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
मंगळवारी सभागृहात जात जनगणनेवरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्त्री-पुऊष नातेसंबंधावर केलेल्या भाष्यप्रकरणी बुधवारी त्यांनी जाहीर माफी मागितली. मी माझ्या वक्तव्याचा स्वत: निषेध करतो, असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली. माझा उद्देश कोणाला दुखावण्याचा नव्हता, माझा प्रयत्न प्रजनन दरातील घसरणीबद्दल स्पष्टीकरण देण्याचा होता, असे ते म्हणाले.
नितीश यांची माफी, भाजपचा गदारोळ
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभेच्या आवारात सर्वप्रथम माफी मागितली. यानंतर त्यांनी दोन्ही सभागृहात आपण शब्द मागे घेण्यास तयार असल्याची स्पष्टोक्ती दिली. तत्पूर्वी, बिहार विधानसभेचे कामकाज बुधवारी सुरू होताच विरोधी पक्ष भाजपने सभागृहात गदारोळ सुरू केला. भाजप सदस्यांनी नितीशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. वाढता गोंधळ पाहून सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. सकाळी 11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते विजयकुमार सिन्हा आपल्या जागेवरून उभे राहिले आणि मुख्यमंत्री ‘मानसिक’ झाल्याचा आरोप केला. ते राज्य चालवण्यास असमर्थ असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सिन्हा यांनी केली. दुपारच्या सत्रातही सभागृहात गोंधळ सुरू राहिला. वाढता गोंधळ पाहून कामकाज दुपारी 4.50 वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्यात आले.