For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केव्ही 2 कडे नितीन शिरगुरकर चषक

10:52 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
केव्ही 2 कडे नितीन शिरगुरकर चषक
Advertisement

केएलएस उपविजेता, श्रेय कंग्राळकर उत्कृष्ट गोलरक्षक, उत्कृष्ट खेळाडू कार्तिक

Advertisement

बेळगाव : आर. डी. फुटबॉल क्लब आयोजित पहिल्या नितीन शिरगुरकर आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात के. व्ही.-2 ने केएलएसचा 2-0 असा पराभव करून शिरगुरकर चषक पटकाविला. कार्तिक (केव्ही) उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट गोलरक्षक श्रेय कंग्राळकर (केएलएस) यांना चषक देऊन गौरविण्यात आले. टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर घेण्यात आलेल्या शिरगुरकर चषक फुटबॉल स्पर्धेच्या चौथ्या उपांत्यपूर्व फेरीत के. व्ही. 2 ने फिनिक्स होनग्याचा 5-2 असा पराभव केला. या सामन्यात के. व्ही. 2 तर्फे अथर्वने 2, राकेशने 2 तर कार्तिकने 1 गोल केला. फिनिक्सतर्फे अमोघने 1 तर 1 स्वयंचित गोल झाला. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बलाढ्या सेंट झेविअर्सचा केएलएसने 1-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्राच्या 44 व्या मिनिटाला अनिकेत पाटीलच्या पासवर जय रेवणकरने चेंडू डीमध्ये मुसुंडी मारून गोल करण्याचा प्रयत्न करत असताना झेविअर्सच्या बचाव फळीतील खेळाडूने ढकलल्याने पंचांनी केएलएसला पेनल्टी बहाल केली. याचा फायदा जय रेवणकरने उचलत गोल करून 1-0 ची आघाडी केएलएसला मिळवून दिली. दुसऱ्या उपांत्यफेरीत सामन्यात के. व्ही.2 ने केएलई इंटरनॅशनलचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात केव्हीच्या अथर्वने तीन गोल करीत स्पर्धेची हॅटट्रीक नोंदविली. तर केएलई इंटरनॅशनल अब्दुलने 1 गोल केला.

Advertisement

अंतिम सामन्याचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे समन्वयक अधिकारी शंकरगौडा पाटील, प्रमुख पुरस्कर्ते नितीन शिरगुरकर व राहुल देशपांडे यांच्या हस्ते दोन्ही संघांच्या खेळाडूंची ओळख करून अंतिम सामन्याला सुरूवात करण्यात आली. या सामन्यात 22 व्या मिनिटाला केएलएसच्या प्रणव लाडने गोल करण्याची नामी संधी दवडली. 28 व्या मिनिटाला केव्हीच्या अथर्वने मारलेला वेगवान फटका केएलएसचा गोल श्रेय कंग्राळकरने उत्कृष्ट अडविला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांचा गोलफलक कोराच राहिला. सामन्याच्या 46 व्या मिनिटाला केव्हीच्या अभिलाषच्या पासवर कार्तिकने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 58 व्या मिनिटाला अथर्वने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी केव्हीने मिळविली. शेवटी हा सामना केव्हीने 2-0 ने जिंकला.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे शंकरगौडा पाटील, नितीन शिरगुरकर, राहुल देशपांडे, नंदिनी मुतालिक देसाई, प्रेमा रायकर, रेखा देगावकर यांच्या हस्ते विजेत्या केव्ही2 व उपविजेत्या केएलएस संघाला चषक, प्रमाणपत्र व सर्व खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट संघ सेंट मेरीज, उत्कृष्ट गोलरक्षक श्रेय कंग्राळकर केएलएस, उत्कृष्ट बचावपटू पवन रायकर केएलएस, उत्कृष्ट खेळाडू कार्तिक केव्ही2, सर्वाधिक गोल अथर्व केव्ही2, उगवता खेळाडू अनिकेत पाटील केएलएस, उत्कृष्ट आघाडीपटू अब्दुल्ला की केएलई, उत्कृष्ट मधल्याफळीतील खेळाडू रूजान झेविअर्स यांना चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून विजय रेडेकर, अखिलेश अष्टेकर, यश सुतार, सुदर्शन चौगुले, तुषार यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :

.