नितीन नवीन @ ‘9 सुनेहरी बाग’
दिल्लीतील नवीन पत्ता : लवकरच ‘टाइप-8’ सरकारी निवासस्थानात स्थलांतरित होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना दिल्लीच्या प्रमुख व्हीव्हीआयपी परिसरात ‘1 मोतीलाल नेहरू मार्ग’ येथील टाइप-8 सरकारी निवासस्थान देण्यात आले आहे. नवीन यांना लुटियन्स दिल्लीतील ‘सुनेहरी बाग रोड’वरील बंगला क्रमांक 9 हा त्यांचा नवीन पत्ता आहे. हा बंगला आता औपचारिकपणे नितीन नवीन यांना मिळाल्यामुळे लवकरच ते दिल्लीला स्थलांतरित होणार आहेत.
‘बंगला क्रमांक 9’ हा टाइप-8 श्रेणीतील असून तो केंद्र सरकारच्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित सरकारी निवासस्थानांपैकी एक मानला जातो. यापूर्वी, हा बंगला झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना देण्यात आला होता. शिबू सोरेन यांनी निवासस्थान रिकामे केल्यानंतर, ते आता भाजपाध्यक्षांना देण्यात आले आहे. ही प्रक्रिया संचालनालयाच्या नियमांनुसार पार पाडण्यात आली.
अमित शाह, राहुल गांधी शेजारी
नितीन नवीन यांना दिल्लीतील सत्तेच्या केंद्रापासून अगदी जवळ असलेल्या ‘9 सुनेहरी बाग रोड’ येथे निवासस्थान देण्यात आले आहे. राजकीय दृष्टिकोनातूनही हे निवासस्थान महत्त्वाचे मानले जाते. नितीन नवीन यांच्या निवासस्थानाशेजारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे निवासस्थान ‘5 सुनेहरी बाग रोड’ येथे आहे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकृत निवासस्थान थोड्या अंतरावर ‘6 कृष्ण मेनन मार्ग’ येथे आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख व्यक्तींमधील ही भौगोलिक जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
टाइप-8 सरकारी बंगल्याची विशेषता
दिल्लीच्या लुटियन्स झोनमधील काही सरकारी बंगले केवळ घरे नाहीत; ते शक्ती, जबाबदारी आणि सुव्यवस्थेचे प्रतीक मानले जातात. येथील बंगले केवळ संवैधानिक आणि राजकीय पदांवर असलेल्या निवडक व्यक्तींसाठी उपलब्ध करून दिले जातात. टाइप-8 बंगला हा केंद्र सरकारच्या निवासस्थानांपैकी सर्वोच्च श्रेणी मानली जाते. हा बंगला सामान्यत: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, माजी राष्ट्रपती, राष्ट्रीय राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि अतिशय वरिष्ठ संवैधानिक पदांवर असलेल्यांना दिला जातो. हे बंगले साधारणपणे अंदाजे 8,000 ते 8,500 चौरस फूट आकाराच्या प्रशस्त जागेत वसलेले आहेत. टाइप-8 बंगल्यात साधारणपणे आठ मोठ्या खोल्या असतात. त्यामध्ये पाच ते सहा बेडरूम, एक प्रशस्त ड्रॉईंग रूम, एक स्वतंत्र जेवणाचे क्षेत्र, एक अभ्यास कक्ष आणि एक आधुनिक स्वयंपाकघर असते. तसेच स्टोअर रुम आणि स्टाफ क्वार्टरसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील असते. बंगल्याभोवतीची हिरवीगार हिरवळ त्याला आणखी खास बनवते.
सुरक्षा अत्यंत कडक
टाइप-8 बंगल्यांमध्ये सामान्य सरकारी निवासस्थानांपेक्षा खूपच कडक सुरक्षा आहे. सुरक्षा कर्मचारी 24 तास तैनात असतात. संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि देखरेखीसाठी नियंत्रण कक्ष आहे. गोपनीयता आणि सुरक्षा राखण्यासाठी पाहुण्या आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आणि निवास व्यवस्था प्रदान केली आहे. लुटियन्स दिल्लीत 3,000 हून अधिक सरकारी निवासस्थाने असून त्यात विविध श्रेणींचे फ्लॅट आणि बंगले आहेत. यापैकी टाइप-8 बंगले सर्वात कमी संख्येने आहेत.