नितीन नबीन यांचा अनुभव देईल भाजपला अधिक बळकटी
मुख्यमंत्री सावंत यांच्यासह प्रमुख नेत्यांनी घेतली नितीन नबीन यांची भेट
पणजी : अनुभवी आणि संघटन बांधणीत अग्रेसर असलेले नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी झालेली निवड ही पक्षाला अधिक बळकटी देणारी आहे. कारण नितीन नबीन यांचा राजकीय प्रवास हा प्रेरणादायी तसेच दूरदृष्टीचा आहे. त्यामुळे त्यांच्या भक्कम संघटनात्मक अनुभवाचा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, उपाध्यक्ष तथा माजी खासदार अॅङ नरेंद्र सावईकर, राज्य सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळकर, सर्वानंद भगत यांनी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा पंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर राज्यातील नेत्यांनी पहिल्यांदाच हा दिल्ली दौरा केला. या भेटीत मुख्यमंत्री सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नितीन नबीन यांच्याशी राज्यस्तरावरील समन्वय अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली.
नितीन नबीन लवकरच गोवा भेटीवर
गोव्यातील संघटनात्मक बांधणी आणि संघटनात्मक कार्याची माहिती घेण्यासाठी नितीन नबीन हे लवकरच गोवा भेटीवर येणार आहेत.