For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘विकसित गोव्या’चा रोडमॅप यशस्वी होणार; तरुणाईचा सावंत सरकारवर विश्वास : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन

08:44 AM Oct 29, 2026 IST | ABHIJEET RANJANE
‘विकसित गोव्या’चा रोडमॅप यशस्वी होणार  तरुणाईचा सावंत सरकारवर विश्वास   भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन
Advertisement

पणजी : गोव्यातील तरुणाईचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर मोठा विश्वास असून, राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याची क्षमता येथील युवकांमध्ये आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 2027 पर्यंत ‘विकसित गोवा’ घडविण्यासाठी आखलेला विकासाचा रोडमॅप यशस्वी होईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी व्यक्त केला. पणजी येथे बुधवारी आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.

Advertisement

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक उपस्थित होते. या संवादाच्या माध्यमातून नबीन यांनी राज्यातील युवकांशी थेट संवाद साधत त्यांच्या आशा-आकांक्षा, अपेक्षा, संकल्पना आणि गोव्याच्या भवितव्याविषयीचा दृष्टिकोन जाणून घेतला.

गोव्याच्या विकास प्रक्रियेत युवकांचे योगदान कसे वाढवता येईल, राज्यासमोरील संधी आणि आव्हाने कोणती आहेत, तसेच विकासाच्या वाटचालीत स्थानिक नेतृत्वाची भूमिका काय असावी, अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. नितीन नबीन आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रश्नांना उत्तरे देत युवकांचे विचार जाणून घेतले.

Advertisement

युवकांशी थेट संवाद साधणे आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेणे हे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे नबीन यांनी नमूद केले. गोव्यातील तरुणाईमध्ये विकासाबाबत सकारात्मक दृष्टिकोन दिसून येत असून, मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वावरील विश्वास समाधानकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.

तरुणाईची व्याख्या वयापुरती मर्यादित नसावी : नितीन नबीन

तरुणाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ वयाच्या निकषावर आधारित नसावा, असे मत नितीन नबीन यांनी व्यक्त केले. कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वतःच्या आयुष्यात, समाजात, राज्यात आणि देशात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता असणारी प्रत्येक व्यक्ती ही तरुणाईचे प्रतिनिधित्व करते, असे त्यांनी सांगितले.

वयाच्या आधारावर तरुणांचे वेगवेगळ्या गटांत विभाजन करण्याऐवजी त्यांच्या विचारांना, क्षमतेला आणि कार्यकर्तृत्वाला महत्त्व दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. युवकांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देऊन त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

‘युवा संवाद’ हे तरुणांसाठी प्रभावी व्यासपीठ : मुख्यमंत्री सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘युवा संवाद’ उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना, युवकांना आपले विचार मांडण्यासाठी आणि भविष्यातील विकासाची दिशा ठरविण्यात सहभागी होण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले.

अशा संवादातून तरुणांना एकमेकांशी चर्चा करण्याची, आपल्या संकल्पना मांडण्याची आणि देशाच्या भवितव्याच्या जडणघडणीत योगदान देण्याची संधी मिळते. युवकांच्या कल्पकतेला योग्य दिशा, आवश्यक संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास गोव्याच्या विकासाला नवी गती मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्याच्या विकास प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून, त्यांच्या अपेक्षा आणि सूचनांचा विचार करून भविष्यातील वाटचाल अधिक प्रभावी करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रउभारणीत युवकांची भूमिका महत्त्वाची : दामू नाईक

भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे कौतुक केले. युवकांना देशाचे भविष्य, त्यांच्या कल्पना, अपेक्षा आणि विकासाबाबतचा दृष्टिकोन मांडण्यासाठी या उपक्रमातून प्रेरणादायी व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात युवकांनी मांडलेले विचार आणि संकल्पना महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करत, विकसित भारताच्या उभारणीत आणि राष्ट्राच्या प्रगतीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नाईक यांनी अधोरेखित केले. युवकांच्या ऊर्जेचा आणि सर्जनशीलतेचा योग्य वापर केल्यास देशाच्या विकासाला अधिक बळ मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

नितीन नबीन यांच्याकडून देवी महालक्ष्मीचे दर्शन

गोवा दौऱ्यावर आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह भाजप शिष्टमंडळातील सदस्यांनी बुधवारी पणजी येथील आराध्य दैवत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले.

यावेळी राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, गोव्याच्या प्रभारी डॉ. भारती पवार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक तसेच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. गोव्यातील जनतेला सुख, शांती आणि समृद्धी लाभावी, तसेच राज्याची निरंतर प्रगती व्हावी, अशी प्रार्थना शिष्टमंडळाने केल्याची माहिती दामू नाईक यांनी दिली.

‘युवा संवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप नेतृत्वाने गोव्यातील युवकांशी थेट संपर्क साधत त्यांच्या अपेक्षा आणि विकासाच्या संकल्पना जाणून घेण्यावर भर दिला. 2037 पर्यंत विकसित गोव्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युवकांचा सहभाग आणि त्यांच्या क्षमतेचा उपयोग महत्त्वाचा ठरणार असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.

Advertisement
Tags :

.