नित्यानंदने बोलिवियात बळकावली जमीन
फरार आरोपी पुन्हा चर्चेत : 20 हस्तकांना अटक
वृत्तसंस्था/ सुक्रे
कैलासा याला जगातील पहिले हिंदू राष्ट्र संबोधिणारा फरार नित्यांनदच्या हस्तकांनी बोलिवियाच्या भूमीवर कब्जा केल्याचा आरोप आहे. नित्यानंदशी संबंधित 20 जणांना बोलिवियाच्या सुरक्षा दलांनी अटक केली आहे. बलात्काराचा आरोपी नित्यानंद 2019 मध्ये भारतातून पसार झाला होता. काही वर्षांनी त्याने युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा निर्माण केल्याची घोषणा केली होती.
कैलासाच्या प्रतिनिधींनी अमेझॉन क्षेत्राच्या जमिनीसाठी स्थानिक समुहांसोबत फसवणूक करत भूभाग मिळविले होते. परंतु या करारांना अमान्य घोषित करण्यात आले आहे आणि कथित कैलासाच्या सदस्यांना निर्वासित करण्यात आल्याचे बोलिवियाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कैलासा नावाचा कुठलाही देश नसल्याने या लोकांना त्यांचा मूळ देश ज्यात भारत, अमेरिका, स्वीडन आणि चीनमध्ये निर्वासित करण्यात आले आहे. कैलासाचा रहिवासी असल्याचा दावा करणारे लोक बोलिवियात पर्यटक व्हिसावर दाखल झाले होते. तसेच त्यांनी बोलिवियाचे अध्यक्ष लुइस आर्से यांची भेट घेत त्यांच्यासोबत छायाचित्रेही काढून घेतली होती.
बोलिविया कथित देश युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासासोबत राजनयिक संबंध बाळगत नाही. कैलासाच्या लोकांनी अमेझॉनच्या मूळ रहिवाशांच्या समुहांसोबत जमिनीच्या भाडेतत्वावरील वापरासाठी करार केल्यावर संबंधित घोटाळा उघडकीस आल्याचे बोलिवियाच्या विदेश मंत्रालयाने सांगितले अहे.
अमेझॉनच्या स्थानिक समुहांपैकी एक बाउरेचे नेते पेड्रो गुआसिको यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. कैलासाच्या प्रतिनिधींसोबत आमचा संपर्क मागील वर्षी झाला होता, तेव्हा ते जंगलातील वणव्यानंतर मदतीचा प्रस्ताव घेऊन पोहोचले होते. त्यावेळी नवी दिल्लीच्या आकाराच्या तीनपट अधिक भूखंडाच्या भाडेतत्वावरील वापराच्या करावर चर्चा झाल्याचे गुआसिको यांनी सांगितले.
बाउरेने 25 वर्षांच्या करारावर सहमती दर्शविली, ज्याच्या अंतर्गत त्यांना वार्षिक जवळपास 2 लाख डॉलर्स मिळणार होते, परंतु कैलासाचे प्रतिनिधींनी सादर केलेल्या मसुद्यात एक हजार वर्षांचा कालावधी नमूद होता आणि यात हवाई क्षेत्राचा वापर आणि नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर देखील सामील होता. तरीही बाउरे यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. कैलासाच्या प्रतिनिधींनी क्षेत्राचे संरक्षण आणि सुरक्षेसाठी वार्षिक बोनसच्या स्वरुपात निधी देण्याचा प्रस्ताव दिला, परंतु तो पूर्णपणे खोटा होता.