सिंधुदुर्गातील भातशेतीची पालकमंत्री नितेश राणे करणार पाहणी; 27 रोजी जिल्हा दौरा
कणकवली प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे रविवारी, 27 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध तालुक्यांमध्ये भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
पालकमंत्री राणे सकाळी 9 वाजता मोपा, गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोटारीने सिंधुदुर्गकडे रवाना होतील. सकाळी 10.30 वाजता सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथे भातशेतीच्या परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर 11 वाजता वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा येथे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
दुपारी 12 वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीबाबत आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. पिकांचे नुकसान, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी याबाबत संबंधित विभागांकडून माहिती घेतली जाणार आहे.
चार तालुक्यांतील भातशेतीची पाहणी
आढावा बैठकीनंतर दुपारी 3.30 वाजता कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे भातशेतीची पाहणी केली जाईल. त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता देवगड तालुक्यातील शिरगाव, शेवरे-तांबळवाडी येथे पाहणी होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे भातशेतीच्या परिस्थितीची पाहणी करून दौरा पूर्ण केला जाणार आहे.
या दौऱ्यात पालकमंत्री राणे शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांचे नुकसान, पाण्याची परिस्थिती आणि इतर अडचणी जाणून घेणार आहेत. पाहणीदरम्यान मिळणाऱ्या माहितीच्या आधारे जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचे वस्तुनिष्ठ चित्र प्रशासनासमोर येण्यास मदत होणार आहे.
दौऱ्यादरम्यान जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच संबंधित तालुक्यांतील प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.