नितेशकुमार विजयी तर मनोजकुमार पराभूत
पॅरिस : 2024 च्या पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताचे बॅडमिंटनपटू नितेशकुमारने एकेरीत आपला विजय नोंदविला. तर मनोजकुमारला मात्र पराभूत व्हावे लागले. पुरूषांच्या एसएल-3 बॅडमिंटन पुरूष एकेरी सामन्यात चीनच्या यांगचा 21-5, 21-11 अशा सरळ गेम्स्मध्ये पराभव केला तर अ गटातील अन्य एका सामन्यात थायलंडच्या एम.बुनसूनने मनोजकुमारचा 21-19, 21-8 अशा गेम्स्मध्ये फडशा पाडला. महिलांच्या एसएल-3 बॅडमिंटन एकेरीच्या अ गटातील सामन्यात भारताच्या मानसी जोशीला युक्रेनच्या कोझीनाने 21-10, 15-21, 23-21 असे पराभूत केले. या पराभवामुळे मानसीचे या क्रीडा प्रकारातील आव्हान संपुष्टात आले आहे.
भाविना, पटेल पराभूत
या स्पर्धेत टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात महिलांच्या दुहेरीत भारताच्या भाविना पटेल आणि सोनलबेन पटेल यांना अ गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे पदक मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. कोरियाच्या जंग आणि मून या जोडीने भाविना आणि सोनलबेन यांचा 11-5, 11-6, 9-11, 11-6 असा पराभव केला.