गोविंदाच्या पुत्रासोबत झळकणार नितांशी
एकता कपूरकडून होणार चित्रपटाची निर्मिती
एकता कपूर स्वत:चा आगामी हॉरर-कॉमेडीपट ‘हीरो की हॉररइन’ची निर्मिती अमर बुटालासोबत मिळून करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद खान करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून गोविंदाचा पुत्र यशवर्धन बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. यशवर्धन आहुजाची नायिका म्हणून यात नितांशी गोयल झळकणार आहे.
या चित्रपटात गोविंदाची पत्नी देखील दिसून येणार आहे. तसेच ‘हीरो की हॉररइन’ चित्रपटात जेमी लीवर, चंकी पांडे, बृजेंद्र काला आणि सिमरत कौर रंधावा यासारखे अनेक कलाकार दिसून येणार आहेत. चित्रपटात हॉरर, रोमान्स आणि ह्यूमरचा मेळ दिसून येणार आहे. यशवर्धन आहुजा आणि नितांशीचा हा चित्रपट पुढील वर्षी 7 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. गोविंदाचा पुत्र यात असल्यामुळे या चित्रपटावरून सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे गोविंदाच्या वैवाहिक जीवनात सध्या वादळ उभे ठाकले असल्याने त्याचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत.