निस्सानकडून भारतात 600 कर्मचाऱ्यांची भरती
नवी दिल्ली :
जागतिक संकटाच्या काळातही निस्सान या कंपनीने भारतातील निर्मिती कारखाना कर्मचाऱ्यांच्या भरतीवरती जोर देणे चालूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. जपानमधील ऑटो निर्माती कंपनीच्या भारतातील निस्सान इंडिया कंपनीने याबाबत स्पष्टता व्यक्त केली आहे.
जपानमधील ऑटो निर्माती कंपनी निस्सान आपल्या भारतातील कारखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यावर भर देत आहे. कंपनीने चेन्नईमधील आपल्या कारखान्यामध्ये नव्याने 600 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जागतिक स्तरावरती अस्थिरता जरी असली तरी भारताबाबत कंपनी उत्पादनाच्या बाबतीत ठाम असल्याचे सांगितले जात आहे. या नव्याने भरती केलेल्या उमेदवारांना कंपनी आपल्या तीन शिफ्टमध्ये सामावून घेणार आहे. निस्सान कंपनीने जुलैमध्ये पुढील 30 महिन्याच्या कालावधीमध्ये आपली नवी पाच मॉडेल्स कार बाजारात आणण्याची घोषणा केली होती. ही घोषणा पाहता भारतामध्ये कंपनी नव्या कारच्या उत्पादनावरती भर देईल असे सांगितले जात आहे. नवे उत्पादन वेळेवर ग्राहकांकरीता उपलब्ध करण्याची धडपड कंपनीची असल्याचे बोलले जात आहे.